IND vs WI 3rd Odi | भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिका जिंकण्यासाठी रंगणार अटीतटीची लढाई
चेन्नईतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर विशाखापट्टमणमध्ये भारताने मालिकेत पुनरागमन केलं. आजचा तिसरा आणि निर्णायक सामना जिंकून वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे.
कटक (ओदिशा) : भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला तिसरा वन डे सामना उद्या कटकमध्ये खेळावला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. चेन्नईच्या पहिल्या वन डेत विंडीजने भारतीय संघाचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. तर विशाखापट्टणमध्ये भारतानं 87 धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली होती. त्यामुळे कटकचा हा सामना मालिकाविजयाच्या दृष्टीनं निर्णायक ठरणार आहे.
विशाखापट्टममधील दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादवच्या हॅटट्रिकच्या जोरावर टीम इंडियाने वन डेत विंडीजचा 107 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात टीम इंडियाने विंडीजला 388 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. पण चायनामन कुलदीप यादवची हॅटट्रिक आणि मोहम्मद शमीच्या प्रभावी माऱ्यामुळे विंडीजचा डाव 280 धावांत आटोपला. कुलदीपने आणि शमीने प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर जाडेजानं एक दोन विकेट्स घेतल्या.
या सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या खणखणीत शतकं ठोकली. रोहित आणि राहुलने पहिल्या विकेटसाठी 227 धावांची भागीदारी रचली होती. रोहितने 138 चेंडूत 159 धावांची खेळी उभारली. तर राहुलने 104 चेंडूत 102 धावा केल्या. रोहित-राहुलनंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरने चौथ्या विकेटसाठी अवघ्या 24 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली.
टीम इंडियाची पहिल्या आणि मधल्या फळी फलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात प्रभावी कामगिरी केली. गोलंदाजांनीही चांगलं प्रदर्शन केलं होतं. आजच्या निर्णायक सामन्यातही टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंकडून हीच अपेक्षा असणार आहे. भारताच्या फलंदाजीच्या आणि गोलंदाजीच्या सामर्थ्यांपुढे ढिसाळ क्षेत्ररक्षण मात्र अडचणीचं ठरत आहे.
संभाव्य भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, यजुवेंद्र चहल, नवदीप सैनी, रवींद्र जाडेजा, केदार जाधव, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मनीष पांडे, ऋषभ पंत, केएल राहुल.
संभाव्य वेस्टइंडिज संघ : कायरन पोलार्ड (कर्णधार), सुनील अॅम्ब्रिस, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, अल्जारी जोसेफ, ब्रेंडन किंग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, इविन लुईस, किमो पॉल, खॅरी पियर, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड, हेडन वॉल्श.