(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुर्यकुमार यादवचं काय चुकलं? निवडसमितीला हरभजनचा संतप्त सवाल
मुंबईच्या सुर्यकुमार यादवची टीम इंडियामध्ये निवड न झाल्याने टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह याने बीसीसीआयच्या निवडसमितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई : नव्या वर्षात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-20 आणि वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह याने बीसीसीआयच्या निवडसमितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईच्या सुर्यकुमार यादवची टीम इंडियामध्ये निवड न करणाऱ्या निवडसमितीच्या संघनिवडीवर हरभजनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सुर्यकुमार यादवला न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी इंडिया-ए संघात स्थान देण्यात आले होते. परंतु राष्ट्रीय संघात सुर्यकुमारचे नाव नसल्याने हरभजन नाराज झाला आहे. हरभजनने त्याची नाराजी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.
हरभजनने ट्वीट केले आहे की, सुर्यकुमार यादवची टीम इंडियामध्ये निवड न झाल्यामुळे मला आश्चर्य वाटतंय. सुर्यकुमारने काय चूक केली आहे? टीम इंडिया, इंडिया-ए, इंडिया-बी संघात निवड झालेल्या इतर खेळाडूंप्रमाणे सुर्यकुमारही खेळतोय. मग त्याच्यासोबत भेदभाव का केला जातोय?
सुर्यकुमारने 73 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4 हजार 920 धावा केल्या आहेत. यामध्ये 13 शतकं आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. या 29 वर्षीय खेळाडूची सरासरी 43.53 इतकी आहे. टी-20 मध्ये तो 149 सामने खेळला आहे. त्यात त्याने 31.37 च्या सरासरीने 3,012 धावा फटकावल्या आहेत. तर आयपीएलमध्ये त्याने 85 सामन्यांमध्ये सात अर्धशतकांच्या सहाय्याने 1548 धावा जमवल्या आहेत.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सलामीवीर शिखर धवनचं संघात पुनरागमन झालं आहे. तर उपकर्णधार रोहित शर्मा आणि यंदाच्या वर्षातला यशस्वी गोलंदाज मोहम्मद शमीला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. भारत आणि श्रीलंका संघातला पहिला सामना 5 जानेवारी रोजी गुवाहाटी येथे खेळवला जाईल.
दिल्लीत झालेल्या बीसीसीआयच्या निवड समितीच्या बैठकीत या दोन्ही संघांची घोषणा झाली. भारतीय क्रिकेटरसिकांसाठी आनंदाची बाब म्हणजे पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमरा पुन्हा संघात परतला आहे. बुमरानं सप्टेंबरपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धची किंग्सस्टन कसोटी खेळल्यानंतर दुखापतीमुळे बुमरानं दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि विंडीजविरुद्धच्या मायदेशातल्या मालिकांमधून माघार घेतली होती.
टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनही अंगठ्याच्या दुखापतीतून सावरल्यानं त्याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेला मुकावं लागलं होतं.
श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेन्टी मालिकेसाठीचा भारतीय संघ पुढीलप्रमाणे विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, शिवम दुबे, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनीष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसनI keep wondering what’s wrong @surya_14kumar hv done ? Apart from scoring runs like others who keep getting picked for Team india india/A india /B why different rules for different players ???
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 24, 2019