SSC Result Motivational Story : धुळ्याची वैष्णवी जन्मत: मूकबधीर, ब्राझील ऑलिम्पिकमध्ये जागा मिळवली, आता दहावी परीक्षेतही गगनभरारी
जन्मजात मूकबधिर असणाऱ्या वैष्णवी मोरेने सर्व अडचणींवर मात करत आधी ब्राझीलमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत एन्ट्री मिळवली त्यानंतर आता दहावी परीक्षेतही तिने घवघवीत यश संपादन केले आहे.
SSC Result : अथक प्रयत्न केले तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते याचच उदाहरण धुळे शहरातील वैष्णवी मोरेने जगासमोर ठेवले आहे. जन्मजात मूकबधिर असणाऱ्या वैष्णवीने आधी दिव्यांगात्वावर (मूकबधिर) मात करत ब्राझीलमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्थान मिळवलं होतं. पण ती केवळ खेळातच निपुण नसून शिक्षणातही आपली छाप सोडली आहे. तिने दहावी परीक्षेत 80 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. क्रिडा क्षेत्रानंतर आता शैक्षणिक क्षेत्रातही तिने यशाला गवसणी घातली आहे. तिच्या या कामगिरीमुळे सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे
धुळे शहरातील मूळची रहिवासी असणाऱ्या आणि महाराणा प्रताप विद्यालयात शिक्षण घेतलेल्या वैष्णवीचे वडील मासे विक्रीचा व्यवसाय करतात. आई गृहिणी असून अत्यंत गरीब परिस्थितीत तिचे कुटुंबीय आपला उदरनिर्वाह करीत आहेत. जन्मजात मूकबधिर असणाऱ्या वैष्णवीचे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण प्राध्यापक रघुनाथ केले वाकश्रवण विद्यालयात झाले. त्यानंतर शहरातील महाराणा प्रताप विद्यालयात तिचे पुढील शिक्षण सुरू होते. वैष्णवी चे वडील बाला मोरे यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. धुळे शहरातील देवपुरातील बापूजी भंडारी गल्लीत राहणाऱ्या वैष्णवीने सर्व अडचणींवर मात करत इयत्ता दहावीच्या परीक्षेत 80 टक्के गुण मिळवले आहेत. काही महिन्यांपूर्वी तिने ब्राझील येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत एन्ट्री मिळवली होती. दरम्यान आता दहावीच्या परीक्षेत तिने यश मिळवल्याने तिच्या पालकांसह शिक्षकांचेही कौतुक होत आहे.
वडिलांना अश्रू अनावर
वैष्णवी मोरे ही जन्मजात मूकबधिर असून देखील तिने क्रीडाक्षेत्रात विविध स्पर्धा आजवर गाजवल्या आहेत. मात्र या सोबत इयत्ता दहावीचा अभ्यास देखील तिने अत्यंत मेहनतीने पूर्ण करीत हे यश संपादन केले. त्यामुळे याक्षणी वैष्णवीचे वडील बाला मोरे यांना अश्रू अनावर झाल्याचेही दिसून आले.
हे देखील वाचा-