जन्मत: मूकबधीर, प्रत्येक संकटांना आसमान दाखवलं, आता धुळ्याची वैष्णवी ब्राझील ऑलिम्पिक गाजवणार
जन्मजात मूकबधिर असणाऱ्या वैष्णवी मोरेने आपल्या दिव्यांगात्वावर (मूकबधिर) मात करत क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे. मे महिन्यात ब्राझीलमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत ज्युदो तिची निवड झाली आहे.
धुळे : 'प्रयत्नकरता अविश्रांत भाग्यश्री घाली माळ गळ्यात' असं म्हटलं जातं आपले प्रयत्न अथक असतील तर आपण कुठल्याही समस्येवर मात करून यश मिळवू शकतो. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे धुळे शहरातील वैष्णवी मोरे. जन्मजात मूकबधिर असणाऱ्या वैष्णवी मोरेने आपल्या दिव्यांगात्वावर (मूकबधिर) मात करत क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे. मे महिन्यात ब्राझीलमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
धुळे शहरातील मूळची रहिवासी असणाऱ्या आणि महाराणा प्रताप विद्यालयात शिक्षण घेतलेल्या वैष्णवीचे वडील मासे विक्रीचा व्यवसाय करतात. आई गृहिणी असून अत्यंत गरीब परिस्थितीत तिचे कुटुंबीय आपला उदरनिर्वाह करीत आहेत. जन्मजात मूकबधिर असणाऱ्या वैष्णवीचे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण प्राध्यापक रघुनाथ केले वाकश्रवण विद्यालयात झाले. त्यानंतर शहरातील महाराणा प्रताप विद्यालयात तिचे पुढील शिक्षण सुरू असून वैष्णवीचे वडील बाला मोरे यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. धुळे शहरातील देवपुरातील बापूजी भंडारी गल्लीत राहणाऱ्या वैष्णवीला लहानपणापासूनच मैदानी खेळांची आवड आहे. गणेशोत्सवात गल्लीत होऊ घातलेल्या मैदानी स्पर्धांमध्ये ती सतत भाग घ्यायची आणि बक्षीस देखील मिळवायची. गल्ली पासून सुरू झालेला तिचा प्रवास आज ब्राझीलपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
वैष्णवी सह्याद्री अकादमी येथे सुवर्ण पदक प्राप्त रचना घोपेश्वर यांच्याकडून प्रशिक्षण घेत असून तिला सह्याद्री संकुलचे विजय बराटे आणि सोलारीस क्लबचे जयंत पवार यांनीही मार्गदर्शन केले आहे. वैष्णवीला लहानपणापासून क्रीडा क्षेत्राची आवड असून दोन वर्षांपूर्वी सातारा येथील कुस्ती स्पर्धेत वैष्णवीने सुवर्ण पदक पटकावले. यानंतर मात्र तिला राष्ट्रीय स्पर्धेत अपयश आले मात्र या अपयशातून खचून न जाता कुस्तीसह तिला ज्युदोची देखील आवड असल्यानं ती पुण्यातील वारजे येथील सह्याद्री स्कूलमध्ये ज्यूदोचा सराव करीत आहे. प्रशिक्षक अर्चना या वैष्णवीला मार्गदर्शन करत होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या डेप ऑलिम्पिक या निवड चाचणीत तिची ज्यूदो या क्रीडा स्पर्धा प्रकारातून ब्राझीलमध्ये होऊ घातलेल्या ऑलम्पिकसाठी निवड झाली.
महाराष्ट्रातून दोघींची निवड
मे महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून केवळ दोन मुलींची निवड झाली असून यातील वैष्णवी ही धुळे शहरातील रहिवासी आहे. या स्पर्धेसाठी 25 मार्च पासून दिल्लीत होऊ घातलेल्या सराव शिबिरात वैष्णवी सहभागी होणार असून दिव्यांगात्वावर मात करत वैष्णवीने संपादन केलेले यश हे आजच्या तरूणाईसाठी प्रेरणादायी आहे. मात्र परिस्थितीअभावी वैष्णवीला ब्राझीलला पाठवायचे तरी कसे असा मोठा प्रश्न तिच्या कुटुंबीयां समोर निर्माण झाला आहे. वैष्णवीच्या यशाने फक्त धुळे जिल्ह्याची नव्हे तर महाराष्ट्राची देखील मान उंचावली असून तिच्या स्पर्धेसाठी शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी तिच्या आई वडिलांनी केली आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : आयपीएलचे 70 सामने मुंबई-पुण्यात, MI-CSK वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, पाहा कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये?
- IND vs SL, 1st Test: रवींद्र जडेजानं रचला इतिहास, कपिल देवचा 'हा' विक्रम मोडला
- IPL 2022 Full Schedule: आयपीएल 2022 चं बिगुल वाजलं, संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणाचा सामना कोणाशी? पाहा एका क्लिकवर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha