धक्कादायक! जळगावमध्ये भर रस्त्यात महिलेची प्रसूती, दमानिया संतापल्या; जिल्हाधिकारी थेट गावात
जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात वैजापूर गावाजवळ भर रस्त्यात महिलेची प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. यावेळी प्रसूती झालेल्या महिलेस वैजापूर गावातील महिलांनी मदत केली आहे. र

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात वैजापूर गावाजवळ भर रस्त्यात महिलेची प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. यावेळी प्रसूती झालेल्या महिलेस वैजापूर गावातील महिलांनी मदत केली आहे. रस्त्यावर महिलेची प्रसूती झाल्याचं लक्षात येताच परिसरातील महिला एकत्र आल्या. त्यातील एका अनुभवी महिलेने पुढाकार घेऊन तिची सुखरूप प्रसूती केल्याचा अनुभव सांगितला आहे. आदिवासी समाजातील ही महिला चोपडा तालुक्यातील बोरमळी येथीलआहे. संताबाई बारेला असं या महिलेचं नाव आहे.
प्रसूती झाल्यानंतरही एक तासभर कोणताही शासकीय यंत्रणेचा कर्मचारी यावेळी उपस्थित नव्हता. आम्ही महिला वेळीच या महिलेच्या प्रसूती वेळी हजर झालो नसतो तर या महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला असता अशा प्रकारची प्रतिक्रिया मदत करणाऱ्या महिलांनी दिली आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही या महिलांनी केली आहे. या घटनेच्या विरोधात आरोग्य विभागाचा निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेनंतर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया?
आदिवासी महिलेचे रस्त्यावर झाली डिलीवरी ? फ़ोन करून सुद्धा, ना डॉक्टर आले ना नर्स? किती निर्दयी ? गावातल्या बायकांनी रस्त्यावर केली डिलीवरी आणि दगडाने नाळ तोडली. काय आपली व्यवस्था ? जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी गावाच्या महिलेला एम्बुलन्स न मिळाल्याने पतीने मोटरसायकल वर दवाखान्यासाठी आणले तेव्हा वैजापूर गावाजवळ (Primary हेल्थ सेंटर एक किमी दूर असताना)रस्त्यावर बाळंतीण झाल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. तब्बल अडीच तास ती बाई व बाळ रस्त्यावर होते पण डॉक्टर आले नाहीत. अवघ्या एक किमी वर ही घटना घडते आणि व्यवस्थित रस्ता असलेल्या गावात ही किती दुर्दैवी घटना आहे. या आदिवासी महिलेला भरपाई मिळायला हवी तसेच संबंधित अधिकारी निलंबीत व्हायला हवेत अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. तसेच नियमित वैजापूर PHC ला अँब्युलन्स असायला हवी अशी मागणी दमानिया यांनी केली.
आदिवासी महिलेचे रस्त्यावर झाली डिलीवरी ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 28, 2025
फ़ोन करून सुद्धा, ना डॉक्टर आले ना नर्स? किती निर्दयी ? गावातल्या बायकांनी रस्त्यावर केली डिलीवरी आणि दगडाने नाळ तोडली. काय आपली व्यवस्था ?
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी गावाच्या महिलेला एम्बुलन्स न मिळाल्याने पतीने… pic.twitter.com/j6PC2B2VHD
दरम्यान, ज्या महिलांनी प्रसूती होण्यासाठी त्या महिलेला मदत केली, त्यांनी या घटनेस जबाबदर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनासह तात्काळ खैऱ्यापाडा इथं दिली भेट
चोपडा तालुक्यातील बोरमळी येथील आदिवासी महिला संताबाई बारेला यांची वैजापूर येथे रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली होती. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनासह तात्काळ खैऱ्यापाडा येथे भेट दिली. घोडाचापर येथून सुमारे 7 किलोमीटरचा चिखलमय आणि कठीण पहाडी प्रवास करत जिल्हाधिकारी व आरोग्य यंत्रणेने पायपीट करत खैऱ्यापाडा गाठले. त्यांनी रस्त्यावर प्रसूती झालेल्या संताबाई बारेला व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याकडून संपूर्ण घटना जाणून घेतली. या घटनेनंतर परिसरात आरोग्य सुविधा दुर्गम आदिवासी भागात अजूनही उपलब्ध नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी प्रशासनावर ताशेरे ओढत, “दोषींवर तात्काळ कारवाई होत नाही, म्हणूनच अशा घटना घडतात, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या:
Nandurbar News : रस्ता नसल्याने महिलेची घरीच प्रसुती, बाळ दगावलं, आईची तब्येत खालावल्याने बांबूच्या झोळीतून 15 किमीचा जीवघेणा प्रवास, नंदुरबारमधील धक्कादायक घटना























