Yuvraj Singh : युवराज सिंगच्या टीमनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, सिक्सर किंगची विशेष रणनीती अन् विजयाचा गुलाल उधळला
IND-C vs PAK-C : वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंडसच्या पहिल्या स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपद मिळवलं. युवराज सिंगच्या नेतृत्त्वात भारतानं पाकिस्तानला पाच विकेटनं पराभूत केलं.
बर्मिंघम : वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंडस (World Champions of Legends) ही स्पर्धा 3 जुलै ते 13 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती. क्रिकेट विश्वातील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये अंतिम फेरीची लढत पार पडली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेल्या खेळाडूंचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारत आणि पाकिस्तान (IND-c vs PAK-C)यांच्यातील अंतिम फेरीची मॅच रोमहर्षक झाली. भारतानं पाकिस्तानला पाच विकेटनं पराभूत करत स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 156 धावा केल्या होत्या. भारतानं हे आव्हान 5 बॉल बाकी ठेवत पूर्ण केलं.
पाकिस्ताननं ग्रुप स्टेजमधील मॅचमध्ये भारताला पराभूत केलं होतं. पाकिस्ताननं त्या मॅचमध्ये धावांचा डोंगर उभारला होता. पाकिस्ताननं त्या मॅचमध्ये 243 धावा केल्या होत्या. भारताच्या तुलनेत पाकिस्तानचा संघ तगडा असल्याचं मानलं जात होतं.भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 156 धावांवर रोखलं.
पाकिस्तान चॅम्पियन्सनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 156 धावा केल्या होत्या. सलामीवीर शरजील खान केवळ 12 धावा करुन बाद झाला. कामगारन अकमल आणि सोहेब मकसूद देखील चांगली खेळी करु शकले नाहीत. कामरान अकमलनं 24 धावा केल्या. शोएब मलिकनं पाकिस्तानचा डाव सावरला. त्यानं 36 बॉलमध्ये 41 धावा केल्या. यामुळं पाकिस्तानच्या संघाला 156 धावांपर्यंत मजल मारता आली. सोहेल तन्वीरनं देखील शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी केली. भारतासाठी अनुरीत सिंहनं 3 विकेट घेतल्या. तर, विनय कुमार, पवन नेगी, इरफान पठाण यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
अंबाती रायडू युसूफ पठाणनं भारताचा डाव सावरला
अंबाती रायडू आणि रॉबिन उथप्पा या दोघांनी भारताच्या डावाची आक्रमकपणे सुरुवात केली. मात्र, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रॉबिन उथप्पा बाद झाला. यानंतर सुरेश रैना देखील चांगली खेळी करु शकला नाही. युवराज सिंगनं गुरकीरत सिंगला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून स्थान दिलं. अंबाती रायडू आणि गुरकीरत सिंग या दोघांनी भारताचा डाव सावरला. अंबाती रायडूनं 50 धावा केल्या. तर, गुरकीरत सिंग 34 धावा करुन बाद झाला. यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. युसूफ पठाण आणि युवराज सिंग यांनी संयमी खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहोचवलं. भारतीय संघाला 12 बॉलमध्ये 13 धावांची गरज असताना युसूफ पठाणनं पहिल्या बॉलवर षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिक्स मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये इरफान पठाणनं चौकार मारत भारत चॅम्पियन्स संघाला विजय मिळवून दिला.
संबंधित बातम्या :
यशस्वी-गिलचा झंझावात, झिम्बाब्वेचा दाणादाण, भारताचा 10 विकेटने विजय, मालिकाही खिशात