Yashasvi Jaiswal Dropped Catch : यशस्वी, तू अयशस्वी का झाला? ते चार कॅच नाही तर मॅच सोडली, जीवदान मिळालेल्या डकेटने 'डाका' टाकला अन् गंभीर संतापला
हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी युवा भारतीय खेळाडू यशस्वी जैस्वालने एका महत्त्वाच्या क्षणी बेन डकेटचा झेल सोडला.

Yashasvi Jaiswal Dropped Catch Of Ben Duckett : हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी युवा भारतीय खेळाडू यशस्वी जैस्वालने एका महत्त्वाच्या क्षणी बेन डकेटचा झेल सोडला. डावातील 39 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मोहम्मद सिराजने इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटला त्याच्या धारदार बाउन्सरवर जवळजवळ अडकवले, परंतु यशस्वी जैस्वाल खूप प्रयत्न करूनही झेल घेऊ शकला नाही आणि चेंडू त्याच्या हातातून सुटला. यशस्वी जैस्वालचा झेल चुकल्यानंतर मोहम्मद सिराज खूप नाराज दिसला.एवढेच नाही तर ड्रेसिंग रूममध्ये बसलेले मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील यशस्वी जैस्वालच्या खराब क्षेत्ररक्षणावर नाराज दिसत होता.
Unending Story From Yashaswi Jaisalwal ; Never Caught A Catch In Important Time . Measure Reason For Lose #INDvsENG #INDvsENGTest #YashaswiJaiswal pic.twitter.com/b36l52rDUt
— Saqlain (@SaqlainHameeed) June 24, 2025
जीवदान मिळालेल्या डकेटने ठोकले शतक
इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट 97 धावांवर खेळत असताना, जैस्वालने त्याला लाईफलाइन दिली. डकेटने हेडिंग्ले येथे चौथ्या डावात शतक झळकावले. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पाचव्या दिवशी दुसऱ्या सत्रात डकेटने 121 चेंडूत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. सामन्याचा पाचवा दिवस असूनही, लीड्सची खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच सोपी आहे. याचा पुरेपूर फायदा इंग्लिश फलंदाज घेत आहेत आणि भारतीय संघ अडचणीत दिसत आहे.
The best all-format opener in the world. pic.twitter.com/q0L978k8BB
— England Cricket (@englandcricket) June 24, 2025
चौथ्या डावात डकेटचे पहिल्यांदाच शतक
बेन डकेटने पहिल्यांदाच कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात शतक झळकावले आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातही हे त्याचे पहिलेच शतक आहे. आतापर्यंत त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात सर्व शतके झळकावली होती. त्याने 121 चेंडूत शतक गाठले आहे. त्याने त्याच्या डावात एकूण 14 चौकार मारले आहेत. भारताविरुद्ध हे त्याचे दुसरे शतक आहे. यापूर्वी, डकेटने गेल्या वर्षी भारत दौऱ्यावरही शतक झळकावले होते. 2010 नंतर इंग्लंडच्या एका सलामीवीराने कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात शतक झळकावले आहे. यापूर्वी अॅलिस्टर कुकने ही कामगिरी केली होती. त्याने बांगलादेशविरुद्ध मिरपूरमध्ये 109 धावांची खेळी खेळली.
यशस्वी जैस्वालचं गचाळ क्षेत्ररक्षण
या सामन्यात यशस्वी जैस्वालची क्षेत्ररक्षणातील कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. पहिल्या डावात त्याने तीन महत्त्वाचे झेल सोडले, जसप्रीत बुमराहच्या चेंडूंवर त्याने अनुक्रमे बेन डकेट, ऑली पोप आणि हॅरी ब्रूकला जीवदान दिले.
दुसऱ्या डावातही ही चूक पुन्हा झाली. मोहम्मद सिराजच्या चेंडूवर 97 धावांवर खेळत असलेल्या बेन डकेटने पुल शॉट खेळला. मिड स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या यशस्वीने पुढे धावत झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू त्याच्या हातातून सुटला आणि डकेटला पुन्हा एकदा संधी मिळाली. या चुकांमुळे भारताला सामना गमवण्याची किंमत मोजावी लागू शकते.
















