(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Cup 1979 History : भारताची विजयाची पाटी कोरीच, पाकिस्तानची सेमीफायनलपर्यंत मजल, विडिंजने जेतेपद राखले
World Cup 1979 History : पहिला विश्वचषक उंचावणाऱ्या वेस्ट इंडिजचा संघ 1979 च्या विश्वचषकात विजयाचे दावेदार म्हणून उतरला होता.
World Cup 1979 History : पहिला विश्वचषक उंचावणाऱ्या वेस्ट इंडिजचा संघ 1979 च्या विश्वचषकात विजयाचे दावेदार म्हणून उतरला होता. पण त्यांच्यापुढे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या तगड्या संघाचे आव्हान होते. पण दुसऱ्या विश्वचषकात वेस्ट इंडिजसमोर सर्वच संघ कमकुवत आणि दुबळे दिसले. वेस्ट इंडिजने दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरत जगभरात आपले वर्चस्व स्थापन केले.
1979 ची विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये 9 जून ते 23 जून यादरम्यान पार पडली होती. 1975 प्रमाणे या स्पर्धेतही आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले होते. कॅनडा संघाने 1979 च्या विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केले होते. ईस्ट आफ्रिका संघ पात्रता फेरीतूनच बाहेर पडला होता. आशियातून भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान हे तीन संघ सहभागी होते. 15 सामन्यानंतर दुसरा विजेता मिळाला होता. भारत आणि श्रीलंका एका ग्रुपमध्ये होते.
ग्रुप अ
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, कॅनडा
ग्रुप ब
वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, भारत आणि श्रीलंका
भारताची निराशाजनक कामगिरी -
1979 च्या विश्वचषकातही भारतीय संघाने अतिशय खराब कामगिरी केली. भारताला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही, तिन्ही सामने गमावले. त्यामुळे साखळी फेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. दुसरीकडे पाकिस्तान संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता.
गतविजेत्या वेस्ट इंडिजने पिहल्याच सामन्यात भारताचा 9 विकेट आणि 51 चेंडू राखून दारुण पराभव केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 190 धावांपर्यंत मजल मारली. वेस्ट इंडिजने हे आव्हान फक्त एका विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताकडून गुंडप्पा विश्वनाथ यांनी 75 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्यांचा अपवाद वगळता सर्व दिग्गज फ्लॉप गेले.
न्यूझीलंडने भारताचा आठ विकेटने पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 55.5 षटकात 182 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल न्यूझीलंड संघाने हे आव्हान दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताकडून सुनील गावसकर यांनी 55 धावांची खेळी केली. त्याशिवाय ब्रिजेश पेटलने 38 धावांचे योगदान दिले.
श्रीलंकेने भारताचा 47 धावांनी पराभव केला. भारतालाही एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. श्रीलंकेने प्रथम फंलदाजी करताना 238 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघ 191 धावांपर्यंत मजल मारु शकला. गोलंदाजीत भारताकडून मोहिंदर अमरनाथ यांनी तीन विकेट घेतल्या. तर फलंदाजीत दिलीप वेंगसरकर यांनी सर्वाधि 36 धावांची खेळी केली.
सेमीफायनलमध्ये काय झाले ?
ग्रुप अ मधून इंग्लंड आणि पाकिस्तान तर ग्रुप ब मधून वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेमीफायनल सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडने 60 षटकात आठ विकेटच्या मोबद्लयात 221 धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ 212 धावांपर्यंतच मजल मारु शकला. न्यूझीलंडच्या संघाला नऊ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या पाकिस्तानसमोर तगडया विंडिजचे आव्हान होते. गतविजेत्या विडिंजने पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. विडिंजने प्रथम फंलदाजी करताना 60 षटकात 293 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानचा संघ 250 धावांपर्यंत मजल मारु शकला.
फायनलमध्ये काय झाले ?
वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 92 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 60 षटकात 286 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल इंग्लंडचा संघ 194 धावांपर्यंत मजल मारु शकला. अंतिम सामन्यात विव रिचर्ड्स यांनी शतकी खेळी केली.