Ishan Kishan : 'इशान किशनला टीम इंडियात जागा नाही, त्याने...' पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचं वादग्रस्त विधान
इशान किशनसाठी टीम इंडियामध्ये पुनरागमन करणे आता खूप अवघड आहे, त्यामुळे त्याने फक्त आयपीएलवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत पाकिस्तानचे माजी क्रिकेटर बासित अली यांनी व्यक्त केले.
Basit Ali on Ishan Kishan : युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन भारतीय संघातून बऱ्याच दिवसांपासून बाहेर आहे. मात्र, तो आता टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बीसीसीआयच्या सल्ल्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही पुनरागमन केले आहे. त्यानंतर बुची बाबू टूर्नामेंटमध्ये इशान झारखंडसाठी अप्रतिम कामगिरी करत आहे. इशानने या स्पर्धेत आतापर्यंत शतकही केले आहे.
काय म्हणाला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू?
दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीने मोठे विधान केलं आहे. त्याचे मत आहे की, आता इशानसाठी टीम इंडियात परतणे खूप कठीण आहे. बासित अलीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर दावा केला आहे की, इशानसाठी टीम इंडियामध्ये परतणे जवळपास अशक्य आहे.
बासित म्हणाला की, 'इशान किशनने आता फक्त आयपीएलवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण तो ऑस्ट्रेलिया मालिकेपर्यंत टीम इंडियामध्ये परत येऊ शकत नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत टीम इंडियात पुनरागमन करणे त्याच्यासाठी कठीण आहे. यानंतर काय होते ते पाहूया. मात्र, बासित अली यांचा दावा खोटा असल्याचे दिसून येत आहे.
सध्या झारखंड संघाचा कर्णधार इशान किशन बुची बाबू क्रिकेट स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. जर इशानने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला तर तो लवकरच टीम इंडियात पुनरागमन करू शकतो.
बांगलादेश मालिकेतून इशान किशन करणार पुनरागमन
आता टीम इंडियाला सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि त्यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेत सीनियर खेळाडूंना विश्रांती मिळाली तर इशान किशन ॲक्शन करताना दिसू शकतो. मात्र पुनरागमन करण्यासाठी त्याला धावा करत राहावे लागेल.
BCCIच्या केंद्रीय करारातून बाहेर
गेल्या वर्षी जेव्हा इशान किशन दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून (India Tour of South Africa) भारतात परतला. तेव्हा त्याने सांगितले की, तो सतत क्रिकेट खेळून थकला होता, त्यामुळे तो ब्रेक म्हणून मालिकेतून परतला होता. पण सोशल मीडियावर चाहत्यांनी इशान किशनबद्दल काही पण गोष्टी बोलायला सुरुवात केली. यानंतर इशान किशन आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला. पण त्यानंतर त्याला ना संघात स्थान मिळाले. ना टी-20 वर्ल्ड कपसाठी राखीव खेळाडूंच्या यादीत. इशान किशनला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले आहे.