पैशांचा पाऊस! IPL-2023 मधून BCCI झाली मालामाल; किती कोटी कमवले? रक्कम ऐकून बसेल धक्का
BCCI Surplus Earning IPL 2023 : एकेकाळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयकडे 1983 मध्ये वर्ल्ड कप विजेत्या संघाला सन्मानित करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. पण आज हे क्रिकेट बोर्ड जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे.
BCCI Surplus Earning IPL 2023 : एकेकाळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयकडे 1983 मध्ये वर्ल्ड कप विजेत्या संघाला सन्मानित करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. पण आज हे क्रिकेट बोर्ड जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बनवण्यात इंडियन प्रीमियर लीगने सर्वात मोठी भूमिका बजावली आहे. दरवर्षी क्रिकेट बोर्डाला आयपीएलमधून हजारो कोटींची कमाई होत असते. हे लक्षात घेऊन जगातील इतर देशांनीही आपल्या देशात अशा लीग सुरू केल्या आहेत.
IPL-2023 मधील ऐतिहासिक कमाई
इकॉनॉमिक टाइम्सच्या एका अहवालात म्हटले आहे की, बीसीसीआयने 2024 मध्ये आयपीएलमधून ऐतिहासिक कमाई केली आहे. ही रक्कम आयपीएल-2023 पेक्षा 5000 कोटी रुपये जास्त आहे. बीसीसीआयने आयपीएल-2023 मधून सुमारे 5120 कोटी रुपये कमावले होते, जे आयपीएल-2022च्या कमाईपेक्षा 116 टक्के जास्त होते. आयपीएल-2022 मध्ये बीसीसीआयचे उत्पन्न 2367 कोटी रुपये होते.
खरंतर, बीसीसीआयच्या 2022-23 च्या वार्षिक अहवालानुसार इकॉनॉमिक टाइम्सने हा खुलासा केला आहे. या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, आयपीएल-2023 पासून बीसीसीआयचे एकूण उत्पन्न वर्षानुवर्षे 78% वाढून 11,769 कोटी रुपये झाले आहे. तर खर्चही 66 टक्क्यांनी वाढून 6,648 कोटींवर पोहोचला आहे. वार्षिक अहवालात असे सांगण्यात आले की, बोर्डाचे मीडिया अधिकार उत्पन्न आयपीएल-2022 मधील 3,780 कोटी रुपयांच्या तुलनेत आयपीएल 2023 पासून 131% वाढून 8,744 कोटी रुपये झाले.
एवढा पैसा कुठून कमावला?
बीसीसीआयने 2023 ते 2027 या कालावधीत आयपीएलच्या नवीन मीडिया अधिकारांमधून बंपर कमाई केली आहे. बीसीसीआयने 48,390 कोटी रुपयांमध्ये मीडिया हक्कांचा करार केला होता. यामध्ये डिस्ने हॉट स्टारने 23,575 कोटी रुपयांना आयपीएलचे टीव्ही हक्क विकत घेतले होते. तर वायकॉम-18 च्या जिओ सिनेमाने 23,758 कोटी रुपयांना आयपीएलचे डिजिटल अधिकार विकत घेतले होते. याशिवाय बीसीसीआयने आयपीएलचे टायटल स्पॉन्सर टाटा सन्सला 5 वर्षांसाठी विकले आहे, ज्यामुळे बीसीसीआयला 2,500 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्याच वेळी, My Circle-11 ने RuPay, angel One आणि Ceat कडून सहयोगी प्रायोजकत्व म्हणून 1485 कोटी रुपये कमावले आहेत.
IPL कधी झाली सुरु?
आयपीएल 2008 मध्ये सुरू झाली. या लीगपूर्वी बीसीसीआयकडे उत्पन्नाचे कोणतेही विशेष साधन नव्हते. पण आयपीएल सुरू झाल्यानंतर बीसीसीआयने उत्पन्नाच्या बाबतीत सर्व क्रिकेट बोर्डांना मागे टाकले आणि नंबर-1 स्थान मिळवले. आता आयपीएल पाहता अनेक देशांनी आपापल्या देशात क्रिकेट लीग सुरू केल्या आहेत.