Ind vs Ban : बुमराह सुट्टीवर तर पंतचे पुनरागमन, बांगलादेश कसोटी मालिकेत 'या' 15 खेळाडूंना गंभीर देणार संधी?
बांगलादेशला पुढील महिन्यात भारताचा दौरा करायचा आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ कसा असेल ते येथे जाणून घ्या.....
India Squad For Bangladesh Test Series : पुढील महिन्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे होणार आहे. या मालिकेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ कसा असेल ते जाणून घ्या....
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने अद्याप टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे या मालिकेसाठी भारतीय संघाचा नवीन कोच गौतम गंभीर कोणत्या खेळाडूंना संधी देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र, कामाचा ताण पाहता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या मालिकेत विश्रांती देण्यात येईल, असा दावा अनेक माध्यमांनी केला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. त्याचबरोबर केएल राहुल, सरफराज खान आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही या मालिकेत संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार हे देखील 15 सदस्यीय संघाचा भाग असू शकतात.
इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलला बांगलादेशविरुद्धही संधी मिळू शकते. पण तो राखीव यष्टिरक्षक म्हणून 15 सदस्यीय संघाचा भाग असू शकतो.
या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करताना दिसू शकतात. त्याचबरोबर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आणि विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या सरफराज खानला इंग्लंडविरुद्ध संधी मिळाली होती. सरफराजने या संधीचे दोन्ही हातांनी सोने केले. अशा स्थितीत त्याला बांगलादेश मालिकेत पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संभाव्य 15 सदस्यीय संघ -
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (राखीव यष्टिरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा.