David Warner: वनडे सीरिजसाठी डेव्हिड वॉर्नर भारतात; मुंबईच्या रस्त्यावर खेळताना ठोकले षटकार; पाहा VIDEO
India vs Australia ODI Series: टीम ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतात दाखल झाला आहे.
India vs Australia ODI Series : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर आता 17 मार्चपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीनंतर मायदेशी गेलेला सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) पुन्हा एकदा या एकदिवसीय मालिकेत सहभागी होण्यासाठी भारतात परतला आहे.
कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये डेव्हिड वॉर्नर फारशी चांगली खेळी करु शकला नाही. त्याच्या खराब फरफॉर्मन्समुळे त्याला टीकेलाही सामोरं जावं लागलं. त्यामुळे आता वॉर्नरची नजर एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करण्यावर असेल, तसेच आपल्या दमदार खेळीने तो टीकाकारांना त्याच्या बॅटनेच उत्तर देईल, यात काही शंकाच नाही.
दरम्यान, डेव्हिड वॉर्नर भारतात परतल्यावर चाहत्यांना त्याचं एक वेगळंच रुप पाहायला मिळालं. ज्यामध्ये तो मुंबईतील रस्त्यावर खेळताना दिसून आला. वॉर्नर मुंबईत गल्ली क्रिकेटचा आनंद लुटताना दिसला. आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना वॉर्नरने लिहिलंय की, "एक छोटीशी गल्ली सापडली, हिट मारायला." या व्हिडीओमध्ये वॉर्नर काही मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे.
View this post on Instagram
स्टीव्ह स्मिथ सांभाळणार ऑस्ट्रेलियन संघाची धुरा
एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियन संघ कर्णधार पॅट कमिन्सशिवाय खेळणार आहे. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाची मदार स्टीव्ह स्मिथ सांभाळणार आहे. त्याचबरोबर या एकदिवसीय मालिकेत प्रदीर्घ कालावधीनंतर पूर्णपणे तंदुरुस्त झालेला अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल मैदानात परतणार आहे. त्यामुळे एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज खेळाडून वॉर्नर आणि मॅक्सवेल यांचं पुनरागमन होत आहे. त्यामुळे एकदिवसीय मालिकेत टीम ऑस्ट्रेलियाचं पारडं काही प्रमाणात का होईना, टीम इंडियापेक्षा जड असणार आहे.
टीम इंडियाच्या या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत अष्टपैलू हार्दिक पांड्या संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे. याशिवाय केएल राहुलच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा असणार आहेत. दरम्यान, श्रेयस अय्यर मात्र दुखापतीमुळे एकदिवसीय मालिका खेळणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचा कस लागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IND vs AUS 1st ODI: वानखेडेवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया भिडणार; कोण ठरणार सरस?