Nashik Leopard News : दबक्या पावलांनी आला, रस्त्यावर उभा राहिला अन्...; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Nashik Leopard News : नाशिकच्या मखमलाबाद शिवारातील गंगापूर कालव्यालगत काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे.

नाशिक : पंचवटीच्या (panchavati) मखमलाबाद शिवारातील (Makhamalabad Shivar) गंगापूर कालव्यालगत वनविकास सागजडी महामंडळाच्या रोपवाटिकेजवळ भरदिवसा नागरिकांना बिबट्याचे (Nashik Leopard News) दर्शन घडले. यामुळे शेतकरी व परिसरात येणाऱ्या शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात नर व मादी तसेच दोन बछडे असल्याची चर्चा आहे.
बिबट्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मखमलाबाद शिवारातील गंगापूर कालव्यालगत काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे कालव्याच्या रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी काकड यांच्या मळ्यातील वासराचा बिबट्याने फडशा पाडला होता. कालव्याच्या परिसरात सकाळी- सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी नागरिक येत असतात.
दिवसाढवळ्या बिबट्या दिसल्याने नागरिक भयभीत
यामुळे बिबट्याकडून मनुष्यावर हल्ला केला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शनिवारी सायंकाळी प्रताप काकड यांच्या मळ्याकडे कालव्याजवळ काही नागरिकांना रस्त्यात बिबट्याचे दर्शन घडले. त्यावेळी काहींनी आपले वाहन थांबवत बिबट्याचा मोबाइलमध्ये व्हिडिओ काढला. मखमलाबाद परिसरात बिबट्या दिवसाही दिसू लागल्याने परिसरातील शेतकरी तसेच नागरिक दहशतीखाली आले आहेत. वनविभागाने याबाबत दखल घ्यावी, तातडीने या परिसर पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
नाशिकमध्ये वर्षभरात पकडले 83 बिबटे
दरम्यान, बिबट्याने अलीकडच्या काळात नैसर्गिक अधिवास सोडून मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळविल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरात नाशिक पूर्वमध्ये 70, तर नाशिक पश्चिममध्ये 13 बिबटे पकडण्यात आले. त्यांना साधारणतः 150 किलोमीटर अंतरावरील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. तर नाशिकमध्ये 360, नगरमध्ये 985 बिबटे असल्याचा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या 3 वर्षात बिबट्यांनी 4,833 प्राण्यांची शिकार केल्याची नोंद आहे. यात प्रामुख्याने कुत्रा, मांजर, शेळी, लहान गुरे यांचा समावेश आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
