Women's T20 WC : पाकिस्तानवर भारताच्या विजयात कोहलीची मोठी भूमिका, जेमिमा रॉड्रिग्ज म्हणाली...
INDW vs PAKW: महिला T20 विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्ज 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरली.
IND vs PAK Womens T20 : महिला T20 विश्वचषक (Womens T20 WC 2023) स्पर्धेत रविवारी (12 फेब्रुवारी) रात्री भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. पाकिस्तानने भारताला विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारतीय संघाने 19व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. या सामन्यात स्टार खेळी केली ती जेमिमा रॉड्रिग्सने. तिने 38 चेंडूत 53 धावांची नाबाद खेळी खेळून भारताला विजय मिळवून दिला. तिची 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवड झाल्यानंतर जेमिमाने या विजयात विराट कोहलीची (Virat Kohli) विशेष भूमिका असल्याचं म्हणाली.
तर सामन्यानंतर जेमिमा म्हणाली, "भारत आणि पाकिस्तानमधील सामने नेहमीच खास असतात. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत आपण हे सामने पाहत आलो आहोत. अलीकडेच, अशाच एका सामन्यात विराट कोहलीने मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तानविरुद्ध अप्रतिम खेळी केली. विराट कोहलीच्या त्या खेळीबद्दल आणि भारताच्या विजयाबद्दल आम्ही बोलायचो. आम्ही देखील तसंच क्रिकेट खेळावं आणि त्याच तसेच सामने जिंकावेत अशी आमची इच्छा होती."
2022 टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराटची दमदार खेळी
विराट कोहलीने गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. विराटने टीम इंडियाला अत्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर काढत विजय मिळवला होता. विराटने दमदार खेळी करत पाकिस्तानच्या तोंडून विजय हिसकावून घेतला होता.
जेमिमाने विराटचा अवतार दाखवला
महिला टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान एका क्षणी सामना भारताच्या हातातून निसटेल असं वाटत होत. शेवटच्या चार षटकात भारताला विजयासाठी 41 धावांची गरज होती. त्यावेळी जेमिमाने दमदार खेळी करत भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 149 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 6 चेंडू बाकी असताना 3 विकेट्स गमावून सामना जिंकला.
भारताने पूर्ण केलं 150 धावाचं लक्ष्य
पाकिस्तानने दिलेलं 150 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना शफाली वर्मा आणि यस्तिका भाटिया यांनी आक्रमक सुरुवात करुन दिली. पण 38 धावांवर यस्तिका भाटिया हिच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. यस्तिका हिने 17 धावांची खेळी केली. त्यानंतर जेमिमा आणि शफाली वर्मा यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण संधूने शफालीला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. शफाली वर्मा 33 धावांवर बाद झाली. त्यनंतर जेमिमा हिने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत भागीदारी करत विजयाकडे आगेकूच केली होती. पण पुन्हा एकदा संधू हिने विकेट घेत भारताला धक्का दिला. हरमनप्रीत कौर 16 धावा काढून तंबूत परतली. हरमनप्रीत बाद झाल्यानंतर भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या होत्या. पण जेमिमा आणि ऋचा घोष यांनी संयमी अन् तितकीच आक्रमक फलंदाजी केली. अखेरच्या चार षटकात 41 धावांची गरज होती. त्यावेळी दोघींनी वादळी खेळी केली. दोघांनी अवघ्या तीन षटकात 41 धावांचा पाऊस पाडला. 17 व्या षटकात ऋचा घोष हिने सलग तीन चौकार लगावत पाकिस्तानच्या तोंडूव विजय हिसकवला. जेमिमाने 19 षटकात उरलीसुरली कसर पूर्ण केली. ऋचा घोष आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी चौथ्या विकेटसाठी 33 चेंडूत 58 धावांची नाबाद भागीदारी केली. जेमिमाने 53 धावांच्या खेळीत 8 चौकार लगावले. तर ऋचा घोष हिने 31 धावांच्या छोटेखानी खेळीत पाच चौकारांचा पाऊस पाडला.
हे देखील वाचा-