(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs BAN: टीम इंडियाची लवकरच होणार घोषणा; बांगलादेशविरुद्ध कोणाला संधी देणार?, पाहा भारताचा संभाव्य संघ
India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून रंगणार आहे.
India vs Bangladesh: बांगलादेशने मंगळवारी ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळविताना पाकिस्तानला दुसऱ्या कसोटीत 6 गड्यांनी नमविले. यासह बांगलादेशने पाकिस्तानला पाकिस्तानमध्येच व्हाइट वॉश देण्याचा पराक्रम देताना दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. आता भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरपासून रंगणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरला होणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीचे सामने संपल्यानंतर बीसीसीआय बांगलादेशविरुद्धच्या कसोटी संघाची घोषणा करू शकते. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीचे सामने 5 ते 8 सप्टेंबर दरम्यान खेळवले जाणार आहेत. ज्या खेळाडूंची निवड केली जाईल ते 12 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेच्या तयारीसाठी चेन्नई येथे सराव शिबिरात भाग घेतील.
दुलीप ट्रॉफीबद्दल बोलायचे झाल्यास, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन वगळता, संघातील इतर सर्व नियमित सदस्य या आगामी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत. शुभमन गिल इंडिया अ संघाचा, ऋतुराज गायकवाड इंडिया सी संघाचा कर्णधार आणि श्रेयस अय्यर इंडिया डी संघाचा कर्णधार आहे. तर भारत बी संघाची कमान अभिमन्यू ईश्वरन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
बांगलादेशविरुद्ध भारताचा संभाव्य कसोटी संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज. मुकेश कुमार, आकाश दीप / अर्शदीप सिंग
टीम इंडिया WTC ची अंतिम फेरी गाठणार?
बांगलादेशनंतर भारतीय संघ मायदेशी न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियासाठी या सर्व कसोटी मालिका खूप महत्त्वाच्या असतील. भारतीय संघापुढे सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्याचे ध्येय असणार आहे.
संबंधित बातमी:
भारत अन् बांगलादेशची कसोटी मालिका रंगणार; सुरेश रैनाच्या विधानाने टीम इंडियाची वाढली चिंता!