(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC T20 Rankings : सूर्यकुमार नंबर 1 टी20 फलंदाज होण्यासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेनंतर दुसऱ्या स्थानापर्यंत घेतली झेप
ICC T20 Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं फलंदाजांची टी-20 रँकिंग जाहीर केली असून यामध्ये भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव तसंच हार्दीक पंड्या यांना फायदा झाला आहे.
Suryakumar ICC T20 Rankings : एकीकडे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तर दुसरीकडे पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड टी20 मालिका पार पडली. यावेळी भारतानं दक्षिण आफ्रिकेला 2-1 ने तर इंग्लंडने पाकिस्तानला 4-3 च्या फरकाना मात दिली. या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं (ICC) टी-20 रँकिंग जाहीर केली आहे. रँकिंगमध्ये भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला बराच फायदा झाला असून तो थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे तो अव्वल स्थानावर असणाऱ्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानपासून (Mohammad Rizwan) केवळ 16 गुणांनीच मागे आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर्याने कमाल फलंदाजी करत प्लेयर ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीराचा (Player Of the Series) पुरस्कार मिळवला. त्याने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 195.08 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने 119 धावा केल्या. सूर्याने पहिल्या टी20 मध्ये 33 चेंडूत 50, दुसऱ्या टी20 मध्ये 22 चेंडूत 61 आणि तिसऱ्या टी20 मध्ये 6 चेंडूत 8 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर सूर्यकुमार यादवने टी20 फलंदाजाच्या रँकिंगमध्ये 838 गुण मिळवले आहेत. दुसरीकडे एक नंबरवर असणारा पाकिस्तानचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिझवानच्य खात्यावर 854 गुण आहेत. दोघांमध्ये केवळ 16 गुणांचा फरक असल्याने सूर्या लवकरच रिझवानला मागे टाकून अव्वल स्थान मिळवू शकतो.
कशी आहे टॉप 10?
पहिल्या स्थानी पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान 254 गुणांसह आहे. दुसऱ्या स्थानावर भारताचा सूर्यकुमार यादव 838 गुणांसह आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 801 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम 777 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा डेविड मलान 733 गुणांसह पाचव्या नंबरवर आहे. सहाव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा आरॉन फिंच 707 गुणांसह तर सातव्या आणि आठव्या स्थानावर अनुक्रमे न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वे (683) आणि श्रीलंकेचा पाथुम निसंका (677) विराजमान आहेत. तसंच नवव्या स्थानी युएईचा मुहम्मद वसिम 633 आणि दहाव्या स्थानी न्यूझीलंडचा मार्टीन गप्टील 628 गुणांसह आहे.