Suryakumar Yadav, IND vs SA : तब्बल 195 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने ठोकल्या धावा, तीन टी20 मध्ये 119 रन, सूर्या ठरला प्लेअर ऑफ द सिरीज
IND vs SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2 सामने जिंकत मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. यावेळी भारताचा मिस्टर 360 अर्थात सूर्यकुमार यादवने चमकदार कामगिरी केली.
Suryakumar Yadav Player Of the Series : भारतीय टी20 संघातील (Indian Cricket team) स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या कमाल फॉर्मात असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत (IND vs SA) सूर्याने कमाल फलंदाजी करत प्लेयर ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीराचा (Player Of the Series) पुरस्कार मिळवला. त्याने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 195.08 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने 119 धावा ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे या मालिकेतच सूर्यकुमारने एक भीमपराक्रमही केला. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत म्हणजेच 543 चेंडूत 1000 धावा पूर्ण केल्या.
सूर्यकुमार यादवने मागील वर्षी भारतीय संघात (Team India) पदार्पण करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. अगदी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत सूर्याने आतापर्यंत तळपदार खेळी सुरु ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या सूर्याने आता देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उत्तम फलंदाजी करत मालिकावीराचा पुरस्कार मिळवला. यावेळी पहिल्या सामन्यात त्याने 33 चेंडूत 50, दुसऱ्या सामन्यात 22 चेंडूत 61 आणि तिसऱ्या सामन्यात 6 चेंडूत 8 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने 195.08 च्या स्ट्राईक रेटने या धावा ठोकल्याने त्याला अधिक वाह-वाह मिळत आहे.
भारतानं 2-1 नं मालिका जिंकली
भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिला सामना तिरुवानंतपुरममध्ये खेळला गेला होता, जो भारतानं 8 विकेट्सने जिंकला. त्यानंतर गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला 16 धावांनी पराभवाची धुळ चारली. यासह भारतानं पहिल्यांदाच मायदेशात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला टी-20 मालिकेत पराभूत केलं. मात्र, अखेरच्या टी-20 सामन्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला व्हाईट वॉश देण्याच्या नामी संधीचं भारताला सोनं करता आलं नाही. भारताला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 49 धावांनी मात दिली. त्यामुळे भारताने मालिका 2-1 ने जिंकली.