Hardik Pandya : हार्दिकच्या समर्थनार्थ पांड्या कुटुंबातील 'खास' व्यक्ती मैदानात, आयपीएल अन् वानखेडेचा दाखला देत ट्रोलर्सला सुनावलं
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला आयपीएलच्या काळात खूप ट्रोल करण्यात आलं होतं. टी 20 वर्ल्ड कपमधील कामगिरीच्या जोरावर हार्दिक पांड्यानं टीकाकारांना उत्तर दिलं.
मुंबई: टी 20 वर्ल्ड कप 2024 चं विजेतेपद भारतीय संघानं (Team India) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 7 धावांनी पराभूत करत मिळवलं. भारतीय क्रिकेट संघ बारबाडोसमधून नवी दिल्लीत दाखल झाला. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण संघानं भेट घेतली. टीम इंडियाचे विजयी शिलेदार मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांची विजयी परेड नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान लाखो चाहते जमले होते. या चाहत्यांचं अभिवादन स्वीकारल्यानंतर टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर दाखल झाली. या ठिकाणी हार्दिक पांड्याच्या(Hardik Pandya) नावाचा उल्लेख करताच स्टेडियमवर हजारो चाहत्यांनी जल्लोष केला. हार्दिक पांड्यासाठी मैदानात जमलेल्या प्रेक्षकांनी देखील घोषणा दिल्या. ज्या वानखेडे स्टेडियमवर काही महिन्यांपूर्वी हार्दिक पांड्याला हुटींगला सामोरं जावं लागलं होतं तिथंच त्याचं कैतुक करण्यात आलं. हार्दिक पांड्याच्या या प्रवासावर त्याची वहिणी म्हणजेच कृणाल पांड्याची पत्नी पंखुडी शर्मा (Pankhuri Sharma) हिची प्रतिक्रिया समोर आली आहे.
हार्दिक पांड्यानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये 6 डावात 48 च्या सरासरीनं 144 धावा केल्या. याशिवाय त्यानं गोलंदाजी करताना 11 विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हार्दिक पांड्यानं 3 विकेट घेतल्य होत्या. या कामगिरीच्या जोरावर हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पुन्हा हिरो ठरला. मात्र, याच हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाल्यानंतर टीकेचा सामना करावा लागला होता. आता हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल पांड्याची पत्नी पंखुडी शर्मा हिनं मोठं वक्तव्य केलंय.
पंखुडी शर्मानं वानखेडे स्टेडियमवरील व्हिडिओ क्लीप शेअर केली होती. त्या व्हिडिओत हार्दिक पांड्याच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीसाठी लोक टाळ्या वाजवताना पाहायला मिळतात. पंखुडी शर्मानं म्हटलं की, "तेच स्टेडियम, तोच व्यक्ती आणि तेच लोक, फक्त वेळ वेगळी आहे" आयपीएलच्या 2024 च्या हंगामात रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कप्तान केल्यानं फॅन्स नाराज होते. मुंबई इंडियन्सला देखील त्यांच्या लौकिकाप्रमाणं कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळं हार्दिक पांड्याला लोकांनी ट्रोल केलं होतं.
हार्दिक पांड्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील चर्चा करताना यापूर्वीचे सहा महिने खडतर होते, असं म्हटलं. हार्दिक पांड्यानं म्हटलं की लोकांनी त्याला सहा महिने खूप ट्रोल केलं, खासगी आयुष्यातही चढ उतार आल्याचं त्यानं म्हटलं. मुंबई इंडियन्स आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिक यांच्या कथित घटस्फोटाच्या चर्चा देखील वाढल्या होत्या. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक या दोघांनी देखील यावर स्पष्टपणे भाष्य केलेलं नाही. मात्र, हार्दिक पांड्यानं त्याच्या कामगिरीच्या टीकाकारांची तोंड बंद केली आहेत. दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करण्यामध्ये हार्दिक पांड्याचं योगदान महत्त्वाचं होतं.
संबंधित बातम्या :