(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रोहित, सूर्यकुमार, हार्दिकला थेट मंचावर बोलावलं; अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात काय घडलं?, Video
Indian Cricket Team Anant Ambani-Radhika Merchant: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला बॉलीवूड कलाकारांसह क्रिकेटपटूंनी देखील खास हजेरी लावली होती.
Indian Cricket Team Anant Ambani-Radhika Merchant: मुकेश व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. 12 जुलैला राधिका मर्चंट हिच्याशी लग्न करून अनंत अंबानी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. सध्या अनंत-राधिकाच्या लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू आहेत. 1 जुलैपासून लग्नाआधीच्या कार्यक्रमांना जोरदार सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल, 5 जुलैला संगीत सोहळा पार पडला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला बॉलीवूड कलाकारांसह क्रिकेटपटूंनी देखील खास हजेरी लावली होती.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), हार्दिक पांड्या (Hardik Pandya), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), इशान किशन, केएल राहुल, कृणाल पांड्या, भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने देखील या संगीत सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी अंबानी कुटुंबियांनी विश्वविजेता संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याच्या मंचावर बोलावून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थित असणाऱ्यांनी उभे राहून खेळाडूंचं कौतुक केलं.
बार्बाडोस ते दिल्ली आणि मुंबई...
तत्पूर्वी गुरुवारी सकाळी 6 वाजता भारतीय खेळाडू बार्बाडोसहून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याचवेळी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईत भारतीय खेळाडूंची विजयी यात्रा सुरू झाली. या परेडमध्ये लाखो लोक रस्त्यावर आले होते. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला होता. अशा प्रकारे भारतीय संघ दुसऱ्यांदा टू-20 विश्वचषक विजेता ठरला. याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता.
वानखेडेवर हार्दिक पांड्याचा जयघोष-
भारताने 17 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतीय फलंदाजांसोबतच गोलंदाजांचं मोलाचं योगदान आहे. शेवटच्या चार षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचं कंबरडं मोडत विश्वचषक हिसकावून आणला. भारतीय संघाच्या या विजयी कामगिरीत हार्दिक पांड्याचा मोलाचा वाटा होता. विश्वचषकातील शेवटची ओव्हर हार्दिकने टाकली होती. या षटकात दक्षिण आफ्रिकेा 16 धावांची गरज होती, पण संघाला आठ धावाच काढता आल्या आणि भारताने विश्वचषक जिंकला. आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्यावर खूप टीका झाली. मात्र, त्याचं हार्दिक पांड्याला आता सर्वांनी डोक्यावर घेतलं आहे. वानखेडे स्टेडिअमवर मोठ्या संख्येने क्रिकेटचे चाहते दाखल झाले आहेत. टीम इंडियाला पाहण्यासाठी आलेले चाहते जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत. वानखेडे स्टेडिअमवर हार्दिक पांड्याच्या नावाचाही जोरदार जयघोष सुरु आहे. आयपीएलमध्ये याच वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्यासाठी छपरी-छपरी अशी घोषणाबाजी करत त्याच्यावर टीका करण्यात आली होती. त्याच मैदानावर आता चाहते, त्याचा जयघोष करत आहेत.