Happy Birthday Shikhar Dhawan: हॅप्पी बर्थडे गब्बर! शिखर धवनच्या कारकिर्दीतील 3 सर्वोत्कृष्ट खेळीवर एक नजर
Happy Birthday Shikhar Dhawan: भारतीय क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज शिखर धवन आज त्याचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे.
Happy Birthday Shikhar Dhawan: भारतीय क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज शिखर धवन आज त्याचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. शिखर धवननं 2010 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केलीय. शिखननं त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. त्यानं स्वतःच्या बळावर बऱ्याच सामन्यात भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. दरम्यान, शिखर धवनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम तीन खेळींवर एक नजर टाकुयात.
श्रीलंकेविरुद्ध वादळी शतक (2017)
भारतीय संघ 2017 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. दरम्यान, डांबूला येथील एकदिवसीय सामन्यात शिखर धवनसमोर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. या सामन्यात शिखरनं अवघ्या 72 चेंडूत शतक ठोकलं होतं. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक ठरलं. या सामन्यात त्यानं 90 चेंडूत नाबाद 132 धावांची खेळी केली होती. ज्यात 23 चौकारांचा समावेश होता, जे श्रीलंकेच्या संघानं मारलेल्या चौकारांपेक्षा चार जास्त होते. शिखरच्या या खेळीमुळं श्रीलंकेच्या संघानं दिलेल्या 217 धावांचं आव्हान भारतानं सहजपणे गाठलं.
एकदिवसीय विश्वचषकात 137 धावांची खेळी (2015)
ऑस्ट्रेलियात 2015 मध्ये खेळण्यात आलेल्या एकदिवसीय विश्वचषकातील साखळी सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताच्या विजयात सलामीवीर शिखर धवननं मोलाची भूमिका बजावली. मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात शिखर धवननं 137 धावा ठोकल्या. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोकृष्ट खेळी ठरली होती. या सामन्यात शिखर धवननं अजिंक्य रहाणे सोबत तिसऱ्या विकेट्ससाठी शतकी भागिदारी करत भारताची धावसंख्या 300 पार पोहचवण्यात मदत केली होती.
कसोटी पदार्पणात 187 धावांची खेळी (2013)
शिखर धवननं 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात शिखर धवननं 174 चेंडूत 187 धडाकेबाज खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ज्यात 33 चौकारांचा समावेश होता. भारताच्या पहिल्या डावात शिखर धवननं अशी कामगिरी केली होती.
शिखर धवनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
शिखर धवननं 34 कसोटी, 165 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 40.6 सरासरीनं 2 हजार 315 धावा केल्या आहेत. ज्यात सात शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शिखर धवनच्या नावावर 6 हजार 782 धावांची नोंद आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शिखरच्या बॅटमधून 17 शतकं आणि 39 अर्धशतकं निघाल. याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये 11 अर्धशतकांच्या मदतीनं 1 हजार 759 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-