Prithvi Shaw : IPL सुरु असताना पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ, 'त्या' प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने बजावली नोटीस
Prithvi Shaw and Sapna Gill : एकीकडे आयपीएल सुरु असताना दुसरीकडे क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्री सपना गील प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने त्याला नोटीस पाठवली आहे.
HC Notice to Prithvi Shaw : आयपीएल (IPL 2023) सुरु असताना क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) च्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे खराब फॉर्ममुळ त्रस्त असलेला पृथ्वी शॉ पुन्हा एकदा सपना गिल प्रकरणी चर्चेत आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पृथ्वी शॉला अभिनेत्री सपना गिल (Sapna Gill) प्रकरणी नोटीस पाठवली आहे. अभिनेत्री आणि इन्फ्लुएंसर सपना गिल यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणी पृथ्वी शॉने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर सपनाला अडचणींचा सामना करावा लागला. तिला काही काळ तुरुंगात काढावा लागला. यानंतर सपना गिलने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आपल्या विरोधातील दाखल गुन्हा रद्द करावी, अशी मागणी सपना गिलने मुंबई उच्च न्यायालयात केली होती. यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने सपनाच्या याचिकेची दखल घेत क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि इतर फिर्यादींना नोटीस पाठवली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने क्रिकेटर पृथ्वी शॉसह अन्य 11 जणांना नोटीस पाठवली आहे. लवकरच त्यांना या नोटीसला उत्तर द्यावं लागणार आहे. मुंबईतील एका पबबाहेर या दोघांमध्ये झटापट झाली होती. पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
काय आहे नेमकं प्रकरण?
पृथ्वी शॉ मित्रांसह मुंबईतील हॉटेलमध्ये असताना सपना गिल आणि तिच्या मित्रांचा पृथ्वीसोबत सेल्फी काढण्यावरून हा वाद झाला. पृथ्वी शॉ याने सेल्फी घेण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ सहारा स्टार हॉटेल येथे असताना सना उर्फ सपना गिल आणि शोबित ठाकूर यांनी त्याच्याकडे सेल्फीसाठी हट्ट केला. दोघांनी सेल्फीही घेतला, मात्र चौथ्यांदा सेल्फी घेण्यासाठी पृथ्वीला सोबत येण्यास सांगितले. पण पृथ्वीने नकार दिला. यावेळी सपना आणि तिच्या मित्राने पृथ्वी शॉचा टीशर्ट धरला आणि त्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. यामुळे पृथ्वी शॉ संतापला. यावेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत सपना आणि शोबितपासून पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राला दूर नेलं. हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्या सपना आणि शोबित याला हॉटेलबाहेर काढले. याचाच राग आल्यानं दोघांनीही पृथ्वी शॉचा बदला घ्यायचं ठरवलं होतं.
सेल्फी घेण्यावरुन सुरु झाला वाद
सपना आणि शोबित हे हॉटेलबाहेर पृथ्वी शॉ बाहेर पडण्याची वाट पाहत थांबून राहिले होते, जवळपास 25 मिनिटं वाट पाहिल्यानंतर पृथ्वी शॉची गाडी जशी हॉटेलबाहेर निघाली तसा या दोघांनी त्यांच्या साथीदारांसह त्याचा पाठलाग केला. या दोघांनी विले पार्लेपासून ओशिवरा असा जवळपास 10 किलोमीटर पृथ्वी शॉचा पाठलाग केला होता. पोलीस तपासादरम्यान पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे सपना गिल आणि तिच्या साथीदारांविरोधात आणखी काही कलमं लावली होती. या व्हिडीओमध्ये सपना गिल ही शोबित ठाकूर आणि अन्य साथीदारांना हल्ल्यासाठी बॅट, चाकू आणि अन्य हत्यारे आणण्यास सांगत असल्याचं ऐकू येत असून त्याआधारे पोलिसांनी आरोपींविरोधात नवीन कलमे लावली. याप्रकरणी सपना गिलला अटक झाली, त्यानंतर तिला जामीन मंजूर करण्यात आला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :