World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव, दक्षिण आफ्रिकेने 134 धावांनी हरवले, लाबुशेनची एकाकी झुंज
World Cup 2023 : पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Australia vs South Africa Live Score, World Cup 2023 : पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी दारुण पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 312 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त 177 धावांपर्यंत मजल मारु शकला. मार्नस लाबुशेन याने एकाकी झुंज दिली. पण आघाडीच्या एकाही फलंदाजाला 30 धावसंख्याही ओलांडता आली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या भेदक माऱ्यापुढे कांगारुंनी लोटांगण घातले. कगिसो रबाडा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय होय. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान झालाय.
टॉप ऑर्डर फ्लॉप, सर्व दिग्गज स्वस्तात तंबूत -
दक्षिण आफ्रिकेच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलिया फलंदाज ढेर झाले. ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी कोलमडली होती. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या सहा फलंदाजांना 70 धावांमध्ये आफ्रिकन गोलंदाजांनी तंबूत धाडले होते. डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टिव्ह स्मिथ, जोश इंग्लिश, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिस यांना मोठी खेळी करता आली नाही. सर्वजण एकापाठोपाठ एक तंबूत परतले. मिचेल मार्श सात धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर डेविड वॉर्नर फक्त 13 धावा करु शकला. स्मिथ 19 धावांचे योगदान देऊन बाद झाला. जोश इंग्लिश याला 5 धावांवर रबाडाने तंबूत पाठवले. मॅक्सवेल 17 चेंडूमध्ये फक्त तीन धावा करु शकला. स्टॉयनिस पाच धावांवर बाद झाला... 17.2 षटकांत ऑस्ट्रेलियाचे सहा फलंदाज तंबूत परतले होते.
लाबूशेनची एकाकी झुंज -
आघाडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परत जात होते, त्यावेळी दुसऱ्या बाजूला लाबुशेन याने चिवट फलंदाजी केली. लाबुशेन याने 74 चेंडूमध्ये 46 धावांचे योगदान दिले. लाबूशेन याने मिचेल स्टार्क याला साथीला घेत ऑस्ट्रेलियाची लाज वाचवली. लाबुशेन आणि स्टार्क यांच्या 69 धावांच्या भागिदारीमुळेच ऑस्ट्रेलियाचा संघ 100 धावसंख्या पार करु शकला. मिचेल स्टार्क याने 51 चेंडूमध्ये तीन षटकारांच्या मदतीने 27 धावांची खेळी केली. स्टार्क बाद झाल्यानंतर लाबुशेनही तंबूत परतला. स्टार्कला जानसन याने तर लाबुशेन याला केशव महाराज याने बाद केले. अखेरीस पॅट कमिन्स याने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. कमिन्स याने अखेरीस चार चौकारांच्या मदतीने 22 धावांची खेळी करत संघाची लाज राखली. ऑस्ट्रेलियाचा संघ 177 धावांत तंबूत परतला.
आफ्रिकेचा भेदक मारा -
दक्षिण आफ्रिकेकूडन कगिसो रबाडा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय मार्को जानसेन, तरबेज शम्सी आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियासमोर 312 धावांचे आव्हान -
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकात 7 विकेटच्या मोबदल्यात 311 धावांचा डोंगर उभरला. दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने 106 चेंडूत 109 धावांची खेळी केली. एडन मार्करामने 44 चेंडूत 56 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. त्याशिवाय जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पाला प्रत्येकी 1 - 1 लिकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाची गचाळ फिल्डिंग -
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण क्विंटन डि कॉक याने वादळी फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेने 311 धावांचा डोंगर उभारला. पण त्याला ऑस्ट्रेलियानेही तितकीच साथ दिली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे सहा झेल सोडले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ सोशल मीडियावर ट्रोल झाला.