IND vs NZ 3rd ODI: 'रायडूचंही करिअर असंच संपलं' संजू सॅमसनला वगळल्यानं माजी क्रिकेटपटू बीसीसीआयवर भडकला!
IND vs NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जातोय.
IND vs NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जातोय. या सामन्यातही भारताचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक संजू सॅमसनला (Sanju Samson) प्लेईंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं. ज्यानंतर सोशल मीडियावर 'वी वॉन्ट संजू' असा ट्रेन्ड सुरू झालाय. याचदरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियानं (Danish Kaneria) संजू सॅमसनला प्लेईंग इलेव्हनमधून वगळल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया दिलीय. अंबाती रायडूचंही (Ambati Rayudu) करिअर असंच संपलं, अशा शब्दात त्यानं बीसीसीआयच्या (BCCI) संघ व्यवस्थापनावर टीका केली. तसेच हे सर्व अंतर्गत राजकारणाचा भाग असल्याचंही त्यानं म्हटलंय.
कनेरियानं त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना असं म्हटलंय की, "अंबाती रायडूचं करिअर अशाचप्रकारे संपलं. त्यानंही खूप धावा केल्या आहेत. पण त्याच्यासोबतंही चुकीचं घडलं. याचं कारण बीसीसीआय आणि निवड समितीमधील अंतर्गत राजकारण आहे. खेळाडूंमध्ये पसंती किंवा नापसंती आहेत का?" असा प्रश्न कनेरियानं उपस्थित केलाय. कनेरियाच्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
आपण एका चांगला खेळाडू गमावू शकतो
"एखादा खेळाडू किती सहन करू शकतो. त्यानं आधीच बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या असतात आणि जिथे त्याला संधी मिळते तिथे तो धावा करतो. आपण एक चांगला खेळाडू गमावू शकतो कारण त्याला संघात निवड आणि न निवडण्याच्या छळाचा सामना करावा लागतो. प्रत्येकाला त्याचे शॉट्स एक्स्ट्रा कव्हर, कव्हर आणि विशेषतः पुल शॉटमध्ये बघायचे असतात", असंही दानिश कनेरियानं म्हटलंय.
न्यूझीलंड दौऱ्यात फक्त एकच संधी
भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात संजू सॅमसनला पहिल्याच एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टी-20 संघात त्याला संधी देण्यात आली नाही. यानंतर, त्याला एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात संधी मिळाली. ज्यामध्ये त्यानं 36 धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून त्याला वगळण्यात आलं
बांगलादेश दौऱ्यातूनही संजू सॅमसनला वगळलं
न्यूझीलंडनंतर भारतीय संघ बांगलादेश दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतंही संजू सॅमसनला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.
हे देखील वाचा-