एक्स्प्लोर
बर्थ डे स्पेशल : सुपर अॅथलीट, सुपर परफॉर्मर विराट कोहली
तो तरुण आहे...देखणा आहे...सुपरफिट आहे आणि यशस्वीही. विराटची आक्रमक देहबोली, त्याचा नीडरपणा ही वैशिष्ट्ये तरुणाईला आणि त्यातही मुलींना जास्त भावतात. त्यामुळेच त्याची लोकप्रियता ही सातत्याने वाढताना दिसत आहे.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आज तीस वर्षांचा झाला. विराटच्या तिसाव्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना लक्षात येणारी उल्लेखनीय बाब म्हणजे वयाच्या अवघ्या तिशीत तो साऱ्या देशाचं लाडकं व्यक्तिमत्त्व बनला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानातल्या कामगिरीने विराटला एकीकडे लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलंय, त्याच वेळी देशातल्या करोडो नागरिकांच्या मनात आज विश्वासाचं दुसरं नाव म्हणून विराट कोहलीनेच घर केलं आहे. भारतीय कर्णधाराच्या या यशाचं गमक काय आहे, ते जाणून घेऊयात
विराट कोहलीच्या देखण्या फलंदाजीने आज साऱ्या जगाला वेड लावलं आहे.
विराटच्या बॅटमधून वाहणारा धावांचा ओघ इतका ओसंडून वाहतोय की, तो मैदानात उतरला की, एखादा नवा विक्रम त्याच्या नावावर लागणं हे समीकरण जणू ठरलेलंच आहे.
विराट कोहली... वन डे क्रिकेटच्या इतिहासातला पाचवा भारतीय दस हजारी मनसबदार.
विराट कोहली... वन डेत दहा हजार धावांचा पल्ला सर्वात जलद ओलांडणारा फलंदाज
विराट कोहली... वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी तब्बल 62 आंतरराष्ट्रीय शतकांचा मालक असलेला फलंदाज.
विराट कोहली... वन डेत सर्वाधिक शतकांच्या शर्यतीत आता नंबर दोनचा फलंदाज.
विराट कोहली... कसोटी आणि वन डे फलंदाजांच्या क्रमवारीतला नंबर वन फलंदाज.
विराट कोहली... टीम इंडियाला कसोटी क्रमवारीत नंबर वन मिळवून देणारा फलंदाज आणि कर्णधार.
विराट कोहली.. कसोटी कर्णधार या नात्याने सर्वाधिक सहा द्विशतकं ठोकणारा पहिला फलंदाज
फॉरमॅट कोणताही असो, क्रिकेटच्या मैदानात विराट कोहलीच्या यशाचा आलेख चढत्या भाजणीने उंचावत आहे. दी ग्रेट व्हीव रिचर्डसला तर विराट कोहलीत आपलं प्रतिबिंब दिसतं. ब्रायन लारा, जेफ थॉमसन, स्टीव्ह वॉ यांच्यासारखी दिग्गज मंडळीही त्याचं कौतुक करताना थकत नाहीत.
विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या यशाचं प्रतिबिंब जाहिरातींच्या दुनियेतही पडलेलं दिसत आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराची ब्रॅण्ड व्हॅल्यूही त्याच्या नावाला साजेशी अशी विराट झाली आहे.
जाहिरातींच्या दुनियेत विराट कोहली हा स्पोर्टस ब्रॅण्ड आज लखलखताना दिसतो याचं कारण त्याच्या वाढत्या लोकप्रियेत दडलं आहे. अर्थात कुणाचीही लोकप्रियता ही अचानक वाढत नाही. त्यामागे काहीतरी सबळ कारणं असावी लागतात.
जाणकार म्हणतात की, विराटनं आज कुठं वयाची तिशी गाठली आहे. तो तरुण आहे...देखणा आहे...सुपरफिट आहे आणि यशस्वीही. विराटची आक्रमक देहबोली, त्याचा नीडरपणा ही वैशिष्ट्ये तरुणाईला आणि त्यातही मुलींना जास्त भावतात. त्यामुळेच त्याची लोकप्रियता ही सातत्याने वाढताना दिसत आहे. साहजिकच विराट कोहली नावाच्या ब्रॅण्डला जगाच्या बाजारात आलेली किंमत ही त्याने क्रिकेटच्या मैदानात मिळवलेलं यश आणि त्याची लोकप्रियता याचाच संगम आहे.
विराट कोहलीचं क्रिकेटच्या मैदानातलं यश आणि त्याची अमाप लोकप्रियता यामागे त्याने गेल्या सहा वर्षांत जाणीवपूर्वक घेतलेली मेहनत आहे. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी सुपर फिटनेसबाबत दिलेल्या सल्ल्याने विराटला उघडा डोळे, बघा नीटचा पहिल्यांदा साक्षात्कार झाला. पण 2012 सालच्या आयपीएलच्या अपयशामुळे त्याचे डोळे खरोखरच उघडले. तोवर विराटची फिटनेससाठीची मेहनत जेमतेमच होती. त्याच्या खाण्यापिण्यावर कसलंही बंधन नव्हतं. रात्री जागवूनही आपण चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो ही त्याची मानसिकता होती. पण 2012 सालच्या आयपीएलमधल्या अपयशाने विराटला जमिनीवर आणलं.
त्या दिवशी विराटने स्वत:ला आरशात निरखून पाहिलं. आजच्या तुलनेत त्याचं वजन तब्बल 11-12 किलोने जास्त होतं. हे शरीर आणि चुकीच्या सवयी घेऊन आपण तिन्ही फॉरमॅट्मध्ये दीर्घकाळ वर्चस्व गाजवू शकणार नाही, याची विराटला पहिल्यांदा जाणीव झाली आणि त्यानं स्वत:ला बदलायचं ठरवलं. तो रोज दीड तास जिममध्ये मेहनत घेऊ लागला. त्याने खाण्यापिण्यावर सक्त बंधनं आणली. तो फक्त सकस आहार घेऊ लागला. शीतपेयं, आईस्क्रीम यावर तर त्याने फुलीच मारली. विराटला बदललेल्या मानसिकतेचे रिझल्ट्स तातडीने मिळाले. मग 2015 साली त्याने आपला व्यायाम आणखी वाढवला. एखाद्या वेटलिफ्टरला साजेसं हेवी वेटट्रेनिंगही त्याच्या व्यायामाचा भाग बनलं. याच कठोर मेहनतीने विराटला एक सुपर अॅथलीट बनवलं.
विराटमधला हा सुपर अॅथलीट प्रचंड यश मिळवूनही समाधानी नाही. तो सतत काहीतरी नवा प्रयोग करुन पाहतो आहे. आता तर वर्षाचे बारा महिने तो श्रावण पाळणार आहे. आपला विराट शंभर टक्के शाकाहारी झाला आहे. विराटने आपल्या आहारातून मांस, मासे आणि अंडी वर्ज्य केली आहेत. इतकंच काय, पण तो दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थही खाण्याचं आवर्जून टाळत आहे. व्हेगन या कडक शाकाहाराच्या अमेरिकी संकल्पनेत दूधही वर्ज्य असतं. कारण ते थेट प्राण्याच्या शरीरातून मिळतं.
विराटच्या आहारवरच्या नियंत्रणाचा हा दुसरा अंक गेल्या पाच महिन्यांपासून सुरु झाला. त्याच्या आहारात आता केवळ प्रोटिन शेक, भाज्या आणि सोयाचा समावेश आहे. कडक शाकाहाराने त्याला मानसिक शांती मिळायला मदत झाल्याचं सांगितलं जात आहे. विराटची पत्नी अनुष्काही व्हेगन आहार घेत असल्याचं कळतं. सेरेना आणि व्हीनस या विल्यम्स भगिनी, माजी धावपटू कार्ल लुईस, फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हॅमिल्टन हे दिग्गज व्हेगन आहार घेतात. फुटबॉलवीर लायनेल मेसीही विश्वचषकाच्या कालावधीत व्हेगन आहारावर असतो म्हणे.
विराट कोहलीच्या पायाशी आज जगातली सारी सुखं लोळण घेत आहेत. पण आयुष्याच्या या टप्प्यावरही त्याच्या मनावर त्याचा ताबा आहे. आपल्यामधला सुपर अॅथलीट आणि सुपर फिटनेसचा ध्यासच आपल्याला यशाच्या आणि लोकप्रियतेच्याही शिखरावर कायम राखणार याचा त्याला विश्वास आहे. विराट कोहलीची हीच वृत्ती तुम्हा-आम्हालाही खूप काही शिकवणारी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement