(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs PAK, Asia Cup: विश्वविक्रमापासून कर्णधार रोहित शर्मा फक्त 12 धावा दूर!
Rohit Sharma India vs Pakistan Asia Cup 2022: आशिया चषकातील सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे.
Rohit Sharma India vs Pakistan Asia Cup 2022: आशिया चषकातील सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. आशिया चषकातील गट सामन्यात भारतानं पाकिस्तानला पाच विकेट्नं धुळ चारली होती. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानचा संघ पूर्ण ताकदीनं मैदानात उतरतील. यामुळं दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज खेळला जाणारा सामना अधिक रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माकडं (Rohit Sharma) विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. टी-20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंड महिला क्रिकेटपटू सुझी बेट्सच्या (Suzie Bates) नावावर सर्वाधिक धावांची नोंद आहे. सूझी बेट्सचा विक्रम मोडण्यापासून रोहित शर्मा फक्त 12 धावा दूर आहे.
रोहित शर्माकडं विक्रमाची संधी
रोहित टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. पण महिला क्रिकेटमध्ये सुझी बेट्सने रोहितपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रोहित शर्मानं आतापर्यंत 134 सामन्यांत 3 हजार 520 धावा केल्या आहेत. ज्यात चार शतक आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. परंतु, सुझी बेट्सच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास तिनं टी-20 क्रिकेटमध्ये 2 हजार 5 हजार 531 धावा केल्या आहेत. म्हणजेच, सुझी बेट्सच्या रोहित शर्मापेक्षा 12 धावा जास्त आहेत. त्यानं पाकिस्तानविरुद्ध 12 धावा केल्यास तो पुरूष आणि महिला दोघांमध्ये सर्वाधिक टी-20 धावा करणारा खेळाडू ठरेल.
सुझी बेट्सची टी-20 कारकिर्द
सुझी बेट्स हिने 131 सामन्यात 3531 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिनं एक शतक आणि 22 अर्धशतकं झळकावली आहेत. टी-20 इंटरनॅशनलमध्ये सुझीची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 124 धावा इतकी आहे. या यादीत महिला क्रिकेटपटूंमध्ये मेग लॅनिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिच्या नावावर 3 हजार 211 धावांची नोंद आहे. तर, पुरुष टी-20 क्रिकेटमध्ये मार्टिन गप्टिल 3 हजार 497 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्यात दोन शतकं आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे.
भारत-पाकिस्तान आज एकमेकांशी भिडणार
यूएईमध्ये सुरु असलेल्या आशिया चषकातील गट सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव करून या स्पर्धेची विजयी सुरूवात केली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाला 19.3 षटकात 147 धावांवर गुंडाळलं. भारतानं हा सामना 5 विकेट्सनं जिंकला. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडं क्रिकेटप्रेमींच लक्ष लागलंय.
हे देखील वाचा-