(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs PAK, Asia Cup 2022: 'हम भी है जोश मै, बाते कर होश मै!' हायव्होल्टेज सामन्यात भारताचा 5 विकेट्सनं विजय
IND vs PAK, Asia Cup 2022: आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवलाय.
IND vs PAK, Asia Cup 2022: आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्स राखून विजय मिळवलाय. नाणेफेक गमावल्यानंर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं भारतासमोर 20 षटकात 148 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं हे लक्ष्य 19.4 षटकांत पूर्ण केलं.
पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं 46 चेंडूत 49 धावांची भागेदारी करत संघाचा डाव सावरला. या सामन्यात रोहित शर्मा 12 तर, विराट कोहली 35 धावा करून बाद झाला. यानंतर रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्यानं दमदार फंलदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले. दोघांमध्ये पाचव्या विकेट्ससाठी 52 धावांची भागेदारी झाली. अखेरच्या षटकात भारताला 7 धावांची गरज असताना रवींद्र जाडेजा आऊट झालाय. परंतु, हार्दिक पांड्यानं विजयी षटकार ठोकून पाकिस्तानला पराभूत केलं.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानच्या संघानं 42 धावात दोन विकेट्स गमावले. भुवनेश्वर कुमारनं तिसऱ्याच षटकात कर्णधार बाबर आझमला (10 धावा) बाद केलं. त्यानंतर आवेश खाननं फखर जमानला (10 धावा) बाद करून माघारी धाडलं. दरम्यान, मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमदनं तिसऱ्या विकेट्ससाठी 38 चेंडूतत 45 धावांची भागेदारी केली. त्यानंतर हार्दिक पांड्यानं इफ्तिखारला यष्टिरक्षक दिनेश कार्तिककडं झेलबाद करून ही भागेदारी तोडली. इफ्तिखारनं 22 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 28 धावा केल्या. इफ्तिखारला बाद केल्यानंतर हार्दिकनं पुन्हा सीमारेषेवर रिझवानला आवेश खानकडं झेलबाद करून पाकिस्तानला चौथा धक्का दिला. रिझवाननं 42 चेंडूंत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 43 धावा केल्या. त्यानंतर हार्दिकने त्याच षटकात खुशदिल शाहलाही (2 धावा) बाद करून भारताला पाचव यश मिळवून दिलं.
पंधराव्या षटकात 97 धावा करत पाच विकेट गमावून पाकिस्तानचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर डगमगताना दिसला. यानंतर पाकिस्ताननं 112 धावांवर मोहम्मद आसिफच्या (9 धावा) रूपात सहावी विकेटही गमावली.पुढच्याच षटकात अर्शदीप सिंहनं मोहम्मद नवाज (1 धाव) बाद केलं. या सामन्याच्या 19 व्या षटकात भुवनेश्वर कुमारनं पाकिस्तान सलग दोन झटके दिले. या सामन्यात भुवनेश्वर कुमार हॅट्रिकपर्यंत पोहचला होता, पण त्याला हॅट्रिक पूर्ण करता आली नाही. भुवनेश्वर कुमारनं प्रथम शादाब खान आणि नंतर नसीम शाहला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. भारताकडून भुवनेश्वर कुमारनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, हार्दिक पांड्या तीन आणि अर्शदीप सिंहनं दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, आवेश खानच्या खात्यात एक विकेट्स जमा झाली.
हे देखील वाचा-