(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तलावात विषारी स्पेंट वॉश पाझरल्यामुळे दोन टन मासे मृत्यूमुखी, यवतमाळमधील शेतकऱ्याचे ७ लाखांचे नुकसान
Yavatmal News Update : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील गुंज येथील डेक्कन डिस्टिलरीद्वारे शिरपूर शिवारात विषारी स्पेंट वॉश हे रसायन फेकण्यात आले आहे. हे रसायन पावसाच्या पाण्यासोबत तलावात पाझरल्यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत.
Yavatmal News Update : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात विषारी स्पेंट वॉश तलावात पाझरल्यामुळे दोन टन मासे मृत्यूमुखी पडले आहेत. महागाव तालुक्यातील गुंज येथील डेक्कन डिस्टिलरीद्वारे शिरपूर शिवारात विषारी स्पेंट वॉश हे रसायन फेकण्यात आले आहे. हे रसायन पावसाच्या पाण्यासोबत शेतातील तलावात पाझरल्यामुळे हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्याचे सात लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकरी गौरव राजीव पाटील (रा. शिरपूर) यांनी याबाबत तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार दिली असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गौरव पाटील यांनी शिरपूर येथील आपल्या शेतात मत्स्य तलावाची निर्मिती केली असून दरवर्षी या तलावातून ते सात ते आठ लाख रुपयांची मासळी विकतात. जवळच असलेल्या गुंज येथील डेक्कन डिस्टिलरीमधील स्पेंट वॉश हे विषारी रसायन शिरपूर शिवारातील नाल्यात आणि डोंगराळ भागात टॅंकरद्वारे टाकण्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी देखील केल्या आहेत.
या संदर्भात उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड आणि तहसीलदार विश्वंभर राणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पथकाने स्पेंट वॉशमुळे प्रदूषित झालेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत.
डेक्कन डिस्टिलरीद्वारे परिसरातील शेत शिवारात फेकलेल्या स्पेंट वॉशबाबत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. 1 जून रोजी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली आणि विहिर व नाल्याच्या प्रदुषित पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेकडे पाठविणार असल्याचे सांगितले होते. त्या नमुन्यांचे काय झाले व कारवाई नेमकी कोठे अडली याबाबत शेतकरी वर्गातून प्रश्न उपास्थित होत आहेत. गौरव पाटील यांना सात लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी आणि डेक्कन डिस्टिलरीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
महत्वाच्या बातम्या