Vidhan Parishad Election: चमत्कार घडेल, पण कुणाच्या बाजूने घडेल हे सोमवारी महाराष्ट्र बघेल: अजित पवार
MLC Election 2022 : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी रणनीती तयार असून उमेदवारांचा मतांचा कोटा जास्त ठेवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजून घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची जनता पाहिल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी जी काही चूक झाली ती यावेळी होणार नाही, यावेळी उमेदवारांचा कोटा जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. मत बाद होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असंही ते म्हणाले.
या सर्व आमदारांना मतदान कसं करायचं त्या संबंधी सर्व मार्गदर्शन करण्यात येईल. आमच्या दोन आमदारांना मतदानाचा अधिकार नाकारला, त्यामुळे अपक्षांच्या मदतीने हे कसं भरुन काढायचं हे पाहिलं जाईल असं अजित पवार म्हणाले.
बहुजन विकास आघाडीला सर्वजण जावून भेटले, त्यांची मतं आपल्याला मिळावी यासाठी आम्हीही प्रयत्न करत असल्याचं अजित पवार म्हणाले. ते म्हणाले की, आजच्या घडीला 284 आमदार मतदान करतील अशी शक्यता लक्षात घेता विजयी आमदारांना 26 मतांची गरज आहेत. 11 पैकी 10 उमेदवार निवडून येणार असून एकट्याचा पराभव होणार. त्यामुळे चमत्कार तर होणार आहेच, पण तो कोणत्या बाजूने होणार ते सोमवारी महाराष्ट्र बघेल.
शरद पवार आमदारांना मार्गदर्शन करणार
राष्ट्रवादीच्या आमदारांची आज संध्याकाळी बैठक होणार असून त्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.
अग्निपथ योजनेवर काय म्हणाले अजित पवार?
अग्निपथ योजनेविरोधात देशभरात युवकांचा रोष निर्माण झाला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होत आहे. त्यावर आता केंद्र सरकारने यामध्ये आणखी दोन वर्षांची वाढ केली. हे आधीच व्हायला हवं होतं. राज्यातील युवकांनी सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होईल असं कृत्य करु नये.
भाजपचे सहा उमेदवार निवडून येणार; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
महाविकास आघाडीतील बेबनावाचा फायदा भाजपला होईल असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. अपक्षांना स्वत: चं मत आहे. त्यांचा अधिकार ते ठरवतील असेही पाटील म्हणाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. राज्यसभेच्या निवडणुीत देखील भाजपला 11 मतांची गरज होती. ती कशी मिळणार असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, ती मतं मिळाली, आमचा उमेदवार विजयी झाला असेही पाटील म्हणाले.