Yavatmal News : कापसाच्या पंढरीत शेतकऱ्यांची बियाणे खरेदीत लूट
खरीप हंगामात यावर्षी साडेचार लाख हेक्टरवर कपाशी लागवडीचे नियोजन केले आहे. अशातच कपशीचे नामांकीत बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रात गेलेल्या शेतकऱ्यांना लिंकिंगचा बोजा सहन करावा लागत आहे.
यवतमाळ: कॉटनसिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणे घेताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकरी आधीच बोगस बियाणे व खत विक्रीद्वारे मागविल्या जात असताना कृषिकेंद्र कडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी कृषी विभागाकडून बियाणांची कमतरता भासणार नाही असे सांगत असताना कापसाच्या पंढरीत शेतकऱ्यांना कपाशीचे बियाणे खरेदीत लूट होत आहे.
खरीप हंगामात यावर्षी साडेचार लाख हेक्टरवर कपाशी लागवडीचे नियोजन केले आहे. अशातच कपशीचे नामांकीत बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रात गेलेल्या शेतकऱ्यांना लिंकिंगचा बोजा सहन करावा लागत आहे. त्यामुळे 853 रुपये किमतीचे कपाशीचे पाकीट 1200 ते 1600 तर तुळशीचे बियाणे एक पाकीट 2600 रुपयांपर्यंत विकत लागत आहे. इतकेच नव्हे तर इतर अतिरिक्त दुसऱ्या कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करावे लागत आहे.
कृषी विभागाचे दुर्लक्ष
यंदा शेतकऱ्यांची पसंती अंकुर कंपनीच्या जय, कीर्ती, हरीश, महिको कंपनीच्या धनदेव, जंगी, राशी कंपनीच्या 659 राशी, 779 राशी, सुपर कॉट, मनिमेकर, सिद्धा अजित कंपनीच्या अजित 155, एक्स प्रवर्धन, तुलसी कंपनीच्या कबड्डी, पंगा या बियांनाला आहे. मात्र, या बियाणांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. हे बियाणे कंपनी कडून उपलब्ध नसल्याचे कृषी केंद्र चालकाकडून उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हवे असल्यास शेतकऱ्यांना नको असलेले इतर बियाणे देखील नाइलाजाने घ्यावे लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
योग्य भाव न मिळाल्याने आर्थिक कोंडी
गेल्यावर्षी अतिपाऊस आणि शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आर्थिक कोंडी झालेला शेतकरी या हंगामात बियाणे व खते खरेदी करताना होणाऱ्या आर्थिक पिळवणूक मुळे पुरता मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसगत करणाऱ्या कृषी केंद्रावर अंकुश ठेवण्याची गरज आहे.
बोगस बियाण्यांचे रॅकेट
खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाण्यांची राज्यभरात होत असलेली विक्री, लोकप्रिय बियाण्यांची व खतांची साठेबाजी तसेच दुकानदारांकडून सुरू असलेली नफेखोरी यावर आळा घालण्याबाबत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी निवेदनाद्वारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्य कृषी आयुक्तांना याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात बोगस बियाणे ब्रँडेड कंपन्यांचे नाव वापरून विक्री केले जाण्याचे अनेक प्रकार घडत असून यावर शासनाचे नियंत्रण नाही, त्याचबरोबर कापसाच्या कबड्डी तसेच सोयाबीनच्या महाबीज 71 यांसारख्या लोकप्रिय बियाण्यांची अधिकच्या व चढ्या भावाने दुकानदार विक्री करतात. याद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक व फसवणूक केली जात असल्याची तक्रार धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्र्यांना गुरुवारी पत्राद्वारे केली होती.