(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Nature Conservation Day 2021 : पुढच्या पिढ्यांना जगवायचं असेल तर निसर्गाचं संवर्धन करणं अत्यावश्यक
मानवाला आपल्या पुढच्या पिढ्यांना जगवायचं असेल तर शाश्वत विकासाच्या मार्गाशिवाय कोणताही पर्याय नाही. त्यासाठी निसर्ग आणि त्यातील प्रत्येक घटकाचं संवर्धन करणं ही अत्यावश्यक बाब बनली आहे.
World Nature Conservation Day : आधुनिक विकासाच्या नावाखाली सुरु असलेले निसर्गाचे शोषण, त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीवर आलेला ताण या गोष्टींमुळे निसर्गाचा समतोल बिघडण्यास सुरु झाला आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग, पूर, दुष्काळ, प्रदूषण अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 जुलैला जागतिक निसर्ग संवर्धन दिवस साजरा केला जातो. त्यातून निसर्ग आणि मानवाच्या संबंधाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
आधुनिक विकासाच्या नावाखाली जगभर निसर्गाच्या स्त्रोतांचे प्रमाणाबाहेर शोषण सुरु आहे. यामुळे वने, वन्यजीव, वनांतून मिळणारे पदार्थ, खनिजे आणि खनिज इंधने अशा आणि इतर सर्वच नैसर्गिक स्रोतांवर मर्यादेबाहेर ताण आला आहे आणि परिणामी ग्लोबल वॉर्मिंग, पूर, दुष्काळ, मानव-वन्यजीव संघर्ष अशा अनेक गोष्टींना समोरं जावं लागत आहे.
जंगलतोड, अवैध वन्यजीव व्यापार, वन्यजीवांचा अधिवास नष्ट होणं, प्रदुषण, प्लॅस्टिकची समस्या या व इतर अनेक समस्या मानवासमोर आवासून उभ्या आहेत. या सर्वच समस्या या मानवनिर्मित आहेत. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन करणे आणि आपल्या पुढच्या पिढीला जगवणे हे सध्याच्या घडीचे सर्वात मोठे लक्ष्य आहे आणि ते केवळ शाश्वत विकासाच्या माध्यमातून साध्य केलं जाऊ शकेल.
माती, पाणी, हवा, उर्जा, खनिजे, वन्यजीव, वनस्पती या सारखी निसर्ग संपदा तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. त्यामुळे त्याचं संवर्धन करणं अत्यावश्यक बाब बनली आहे.
रशियन विचारवंत लिओ टॉलस्टॉय म्हणतो की, मानव आणि निसर्गामध्ये असलेला सकारात्मक बंध कायम राहणे ही आनंदी जीवन जगण्यासाठी सर्वात महत्वाची आणि प्राथमिक गोष्ट आहे. तसेच महात्मा गांधीनीही म्हटलं आहे की, पृथ्वीकडे प्रत्येकाची गरज भागवण्याची क्षमता आहे पण प्रत्येकाची लालसा किंवा लालच भागवण्याची क्षमता नाही.
पुढच्या पिढ्यांचे रक्षण करायचं असेल तर मानवासमोर सध्या शाश्वत विकासाशिवाय कोणताही मार्ग नाही. त्यासाठी शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करणे आवश्यक आहे. रीड्यूस, रीयुज आणि रीसायकल या तीन गोष्टींच्या माध्यमातून आपण निसर्गाचे संवर्धन करु शकतो. त्याच पद्धतीने प्रत्येकाने एक झाड लावून आपल्या परिने निसर्गाच्या संवर्धनात योगदान देऊ शकतो.
संबंधित बातम्या :
- APJ Abdul Kalam Death Anniversary : भारताचे 'मिसाईल मॅन' अब्दुल कलामांच्या बाततीत 'या' दहा गोष्टी माहिती आहेत का?
- World IVF Day: आज जागतिक आयव्हीएफ दिन! अपत्य न होणाऱ्या जोडप्यांसाठी वरदान, काय आहे IVF? तज्ञांकडून जाणून घ्या...
- World Population Day 2021 : का साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व