(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mehul Choksi Update : मेहुल चोक्सीसोबत असणारी ‘ती’ महिला गर्लफ्रेंड नसून अपहण करणाऱ्या टोळीची सदस्य : सूत्र
मेहुल चोक्सी डोमिनिका येथे आला तेव्हा त्याच्याबरोबर एका महिला होती. ही महिला मेहुल चोक्सीची गर्लफ्रेंड असल्याचा दावा ॲंटिगाचे पंतप्रधान ब्राऊन यांनी केला होता.
Mehul Choksi : मेहुल चोक्सीच्या (Mehul Choksi) या अपहरणाच्या ड्रामामध्ये एक 'मिस्ट्री वूमन आहे. ही महिला चोक्सीची गर्लफ्रेंड असून तिलाच भेटण्यासाठी चोक्सी डोमिनिकाला गेल्याची माहिती होती. मात्र तपासामध्ये हे स्पष्ट झाले की मेहुल चोक्सी डोमिनिका येथे आला तेव्हा एका महिलेबरोबर होता. पण ती त्याची मैत्रीण नव्हती. फरार व्यवसायिकाच्या जवळच्या सूत्रांनी एबीपी माझाला सांगितले की, चोक्सीच्या अपहरण करणाऱ्या गॅंगची ती महिला सदस्य होती.
या महिलेचे नाव बाबारा जाराबिका असल्याची माहिती ॲंटिगा मिडियाच्या माध्यमातून समोर आली. ॲंटिगाचे पंतप्रधान ब्राऊन यांनी हा खळबळजनक दावा केला होता की बाबरा ही मेहुल चोक्सीची गर्लफ्रेंड आहे आणि तिच्या सोबतच मेहुल डोमिनिकाला गेला होता. अँटिगा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांच्या म्हणण्यानुसार चोक्सी आपल्या कथित मैत्रीण बाबारा जाराबिकासोबत यॉटवर डिनर आणि फिरण्यासाठी शेजारील बेट डोमिनिका येथे गेला होता. तेथे त्याला पकडण्यात आले. मेहुलला पकडल्यानंतर त्याची मैत्रीण बाबारा जाराबिकाही बेपत्ता आहे.
पण चोक्सीच्या जवळच्या लोकांकडून माहिती मिळाली की, ही महिला अँटिगामध्ये राहत होती. सकाळी आणि संध्याकाळी वॅाक करता करता तिची आणि चोक्सीची मैत्री झाली. त्यानंतर तिने चोक्सीला भेटण्यास सुरवात केली. 23 मे ला भेटण्यासाठी चोक्सीला आपल्या अपार्टमेंटमध्ये बोलावल. जेव्हा तो पोहचला तेव्हा एका टोळीने चोक्सीच अपहरण केले आणि डोमिनिका येथे नेले.
अँटिगा आणि भारतीय एजन्सीच्यावतीने त्याचे अपहरण करण्यात आल्याचे चोक्सीच्या वकिलांनी सांगितले आहे. दरम्यान, अँटिगामध्ये चोक्सीच्या वकिलांनी म्हटले आहे की त्यांचा क्लायंट 23 मे रोजी त्याची मैत्रीण बाबाराला भेटायला आला होता. पण जॉली हार्बर परिसरातील अँटिगा पोलिस आणि भारतीय अधिकाऱ्यांनी त्याचे 'अपहरण' केले
कोण आहे बाबारा जाराबिका?
कॅरिबियन माध्यमांनुसार, बाबारा जाराबिका ही प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे आणि तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले आहे. बाबारा जाराबिकाच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये असे दिसून आले आहे की, ती एक अतिशय विलासी जीवन जगते. काही चित्रांमध्ये ती लक्झरी बोटवर दिसली आहे. तर काहींमध्ये ती हेलिकॉप्टरमधून प्रवास करत आहे. एवढेच नाही तर तिला महागड्या हॉटेल्समध्ये राहण्याचीही आवड आहे.
मेहुल चोक्सी आणि बाबारा मागील एक वर्षापासून एकमेकांना ओळखत असल्याच कळतंय. बाबाराचा शोध ही घेतला जातोय कारण त्या रात्री चोक्सी सोबत काय झालं हे बाबारा सांगू शकते.