Ukraine-Russia War: रशिया युक्रेन युद्धाचा 12 वा दिवस, आज पंतप्रधान मोदी करणार युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा
भारत सरकारच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज स्वतः युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार आहेत.
Ukraine-Russia War : रशिया-युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा आजचा 12 वा दिवस आहे. आत्तापर्यंत दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. पण त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकले नाही. आज शांततेच्या प्रयत्नांबाबत दोन्ही देशांमध्ये तिसरी फेरी होणार आहे. दरम्यान, भारत सरकारच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज स्वतः युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार आहेत. यापूर्वी युक्रेननेही पंतप्रधान मोदींना मदतीचे आवाहन केले होते. युद्ध सुरु झाल्यानंतर पंतप्रधान मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी पहिल्यांदाच चर्चा करणार आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटेकेसह युद्ध कसे थांबवता याबाबत दोन्ही देशांच्या या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील अनेक शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, शेकडो जणांचा जीव गेला आहे. तसेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हेही रशियासमोर हार मानायला तयार नाहीत. रशिया-युक्रेनमधील हा वाढता तणाव पाहता आता इस्रायल, फ्रान्स आणि तुर्कस्तान शांततेसाठी समझोता करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, रशिया आणि युक्रेन आज तिसर्या फेरीसाठी समोरासमोर बसणार आहेत. याआधी झालेल्या चर्चेच्या दोन फेऱ्यांमधून काहीही निष्पन्न झाले नाही.
इस्त्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी म्हटले आहे की, युक्रेनचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता नसली तरीही त्यांचा देश या संकटावर राजनैतिक तोडगा काढण्यासाठी मदत करत राहील. बेनेट यांनी रविवारी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलत होते. मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत अचानक झालेल्या बैठकीनंतर परतल्यानंतर काही तासांनी त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्याचवेळी पुतिन यांनी पुन्हा एकदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला. फ्रान्सने सांगितले की, त्यांच्या चर्चेत उत्साहवर्धक काहीही नव्हते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेनविरुद्ध छेडलेले हे युद्ध थांबवण्यास तयार आहेत, परंतू युक्रेन त्यांच्या अटी मान्य करेल तेव्हाच हे होईल. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांच्याशी झालेल्या चर्चेच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. रविवारी तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात देखील चर्चा झाली.
रशियाची एक मोठी अट आहे की युक्रेनने NATO (उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) मध्ये सामील होऊ नये. युक्रेनने वाटेल ते करावे, पण नाटोमध्ये सामील होता कामा नये, असे रशिया अनेक वर्षांपासून म्हणत आहे. युक्रेन नाटोचा सदस्य बनल्याने आमच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असा दावा रशियाने केला आहे. हेच युक्रेनशी रशियाच्या युद्धाचे मुख्य कारण आहे. रशिया-युक्रेनच्या या युद्धात आतापर्यंत 15 लाख लोक विस्थापित झाले आहेत. यासोबतच शेकडो जवान शहीदही झाले आहेत. या मृतांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा देखील समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Mukul Arya : पॅलेस्टाइनमधील दूतावासात भारतीय राजदूताचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केले दु:ख
- Russia-Ukraine Conflict : युक्रेनमधील ओडेसावर रशियाकडून हल्ला होऊ शकतो : झेलेन्स्कींचा दावा