Corona Vaccine : दुसऱ्या डोसनंतर काही महिन्यातच लसीचा प्रभाव संपतो, बूस्टर डोस अत्यावश्यक; इस्त्रायलच्या संस्थेचा अभ्यास
कोरोना लसीचा (Corona Vaccine) दुसरा डोस घेतल्यावर सहा महिन्यांनंतर शरीरातील अॅन्टिबॉडी कमी-कमी होत असल्याचं या अभ्यासात दिसून आलं आहे. त्यामुळे बूस्टर डोस आवश्यक असल्याचं सांगण्यात येतंय.
Corona Vaccine : फायझर (Pfizer) आणि BioNTech कंपनीच्या कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीनंतर त्या लसीचा प्रभाव कमी होत जातो, शरीरातील अॅन्टिबॉडीज कमी होत जातात असं इस्त्रायलच्या संस्थेनं केलेल्या एका अभ्यासातून समोर आलं आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरातील अॅन्टिबॉडी अधिक वेगाने कमी होतात असंही समोर आलं आहे. त्यामुळे कोरोना लसीच्या दोन डोस नंतर लसीचा तिसरा डोस घेणं अत्यावश्यक असल्याचं या अभ्यासात सांगितलं आहे.
लसीच्या माध्यमातून शरीरात असलेल्या अॅन्टिबॉडी या सहा महिन्यांनंतर हळूहळू कमी-कमी होत जातात. इस्त्रायलच्या पाच हजार कर्मचाऱ्यांवर केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट झालं असून हा अभ्यास 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन' या मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. तरुणांच्या तुलनेत वृद्धांच्या शरीरातील अॅन्टिबॉडी या अधिक वेगाने कमी होतात. हा अभ्यास इस्त्रायलच्या शेबा मेडिकल सेंटर (Sheba Medical Center) Ramat Gan या संस्थेकडून करण्यात आला आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या सायरस पूनावाला यांनी कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांनी तिसऱ्या किंवा बूस्टर डोसच्या गरजेवर या आधीच भर दिला होता.
बूस्टर डोसची गरज नाही- WHO
ऑगस्ट महिन्यात एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं होतं की, कोरोनाच्या ताज्या आकडेवारीवरुन ही गोष्ट निश्चितच म्हणू शकतो की सध्या बूस्टर डोसची गरज नाही. यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे.
गरीब देशांमधील सर्वांचं जोपर्यंत लसीकरण होत नाही, तोपर्यंत जगातील श्रीमंत देशांनी आपल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबत विचारही करु नये. गरीब देशांतील नागरिकांना लसीचे दोन डोस उपलब्ध करुन देण्याच्या लक्ष्यापासून आपण अद्यापही दूर आहोत असं जागतिक आरोग्य संघटनेचं मत आहे.
दरम्यान, अमेरिकेने 20 सप्टेंबरपासून त्या देशातील सर्व नागरिकांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन सरकारनं डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं हा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या :
- Coronavirus India Updates : देशात पुन्हा वाढला कोरोनाचा प्रादुर्भाव; 24 तासांत 22 हजार 431 नव्या रुग्णांची नोंद
- कोविडमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या 306 अनाथ बालकांच्या खात्यात सुमारे 15 कोटी 30 लाख रुपये जमा
- Corona Death : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 हजार नुकसान भरपाई मिळणार, केंद्राच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी