(Source: ECI/ABP News/ABP Majha)
श्रीलंका चीनच्या जाळ्यात अडकला; चीनच्या कर्जामुळे श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, उपासमार आणि बेरोजगारीचं संकट तीव्र
Sri Lanka : कोरोनामुळे फटका बसलेल्या श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर जवळपास 54 हजार कोटी रुपयांचं आंतरराष्ट्रीय कर्ज असून त्यातील 68 टक्के कर्ज हे एकट्या चीनचं आहे.
नवी दिल्ली : चीनच्या कर्जामध्ये बुडालेली श्रीलंकेची अर्थव्यवस्था आतापर्यंत सर्वात वाईट अवस्थेतून संक्रमण करत आहे. महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की लोकांना एकवेळच्या खाण्याच्या आणि पिण्याच्या गोष्टीही खरेदी करणं परवडत नाही. कोरोना महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था रिकामी होत आहे. परकीय चलनाचा साठा गेल्या 10 वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला आहे. चीनच्या कर्जामुळे श्रीलंकेवर आता बेरोजगारी आणि उपासमारीचं संकट आलं आहे.
अजून काही महिने श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेची हीच अवस्था राहिली तर 2022 मध्ये श्रीलंकेचे दिवाळं निघाल्याशिवाय राहणार नाही असं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. श्रीलंका सरकारने यामधून मार्ग काढण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. या आर्थिक मदतीच्या पॅकेजमुळे महागाई वाढणार नाही असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच या आर्थिक पॅकेजमुळे जनतेवर कोणताही नवीन टॅक्स लावण्यात येणार नाही असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.
श्रीलंकेची अर्थव्यवस्था चीनच्या कर्जात बुडाली
श्रीलंकेला येत्या वर्षभरात जवळपास 54 हजार कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय कर्ज चुकवावं लागणार आहे. या कर्जापैकी 68 टक्के कर्ज हे एकट्या चीनचे आहे. श्रीलंकेला चीनचे तब्बल 37 हजार कोटी रुपयांचे कर्ज चुकवावं लागणार आहे. गेल्या वर्षी आर्थिक संकट आल्यानंतर श्रीलंकेने चीनकडून मदतीच्या स्वरूपात जवळपास सात हजार कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं.
श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. पण गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनामुळे या देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे या देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्रीलंकेतील तब्बल पच लाख लोकांना दारिद्र्य रेषेखाली जावं लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :