Spy Balloon in Colombia : चीनच्या कुरापती सुरुच? अमेरिकेनंतर आता कोलंबियामध्ये 'स्पाय बलून', प्रशासनाची करडी नजर
Surveillance Balloon in Colombia : चीनकडून स्पाय बलूनद्वारे हेरगिरी करण्याचा आणि पाळत ठेवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
Surveillance Balloon in Colombia : चीनच्या (China) कुरापती काही थांबताना दिसत नाही आहेत. अमेरिकेनंतर (America) आता आणखी एका देशात स्पाय बलून (Spy Balloon) उडताना पाहायला मिळाला आहे. अमेरिकेमध्ये दिसलेल्या 'चायनीज स्पाय बलून'बद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव देखील वाढला आहे. अमेरिका आणि चीनमधील हा तणाव अद्याप शांत झालेला नाही. अशातच आणखी एका देशात चीनचा स्पाय बलून उडताना दिसला आहे. अमेरिकेनंतर आता कोलंबियामध्ये स्पाय बलून उडताना दिसल्याचं समोर आलं आहे. कोलंबियाच्या लष्कराला त्याच्या हवाई क्षेत्रावर एक संशयास्पद फुगा दिसला आहे. कोलंबियन सैन्याने रविवारी 5 फेब्रुवारी रोजी सांगितले की, त्यांना लष्करी हवाई क्षेत्रामध्ये आकाशात एक मोठा फुगा दिसला. लष्काने फुग्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. यासंबंधित अधिक तपास सुरु आहे.
अमेरिकेनंतर आता कोलंबियामध्ये 'स्पाय बलून'
कोलंबिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्येकडील एक देश आहे. अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेनंतर या दक्षिण अमेरिका खंडातील कोलंबिया देशाच्या अधिकाऱ्यांनीही चिनी स्पाय बलून दिसल्याचा दावा केला आहे. कोलंबियाच्या हवाई दलाने माहिती देत सांगितले की, त्यांना देशाच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर 55,000 फूट उंचीवर एक वस्तू आकाशात उडताना पाहिली. हवाई दलाने सांगितले की, देशाच्या उत्तरेकडील प्रदेशात फुग्यासारखी दिसणारी काहीतरी 25 नॉट्सच्या सरासरी वेगाने फिरत होते.
अमेरिकेने फोडला चीनचा स्पाय बलून
अमेरिकेच्या आकाशात नुकताच काही दिवसांपूर्वी एक मोठा चिनी फुगा उडताना दिसला होता. चीन स्पाय बलूनद्वारे हेरगिरी करत असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. पण, चीनने हे आरोप फेटाळत हा फुगा फक्त हवामानासंदर्भात माहिती गोळा करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. पण, हेरगिरीच्या संशयामुळे अमेरिकेने क्षेपणास्त्र मारा करत चीनचा स्पाय बलून फोडला. यानंतर चीन मात्र भडकला. अमेरिकेला याचा मोठा फटका बसेल, अशी प्रतिक्रिया चीनने दिली आहे.
स्पाय बलूचा वापर काय?
स्पाय बलूनचा अर्थ हेरगिरीसाठी वापरण्यात येणारा फुगा. स्पाय बलूनद्वारे क्लोज-रेंज मॉनिटरिंग म्हणजेच अत्यंत जवळून निरीक्षण केले जाते. कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील एरोस्पेस अभियांत्रिकी विज्ञानाचे प्राध्यापक इयान बॉयड यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, हे फुगे हेलियम वायूने भरलेले असल्यामुळे वजनाने अतिशय हलके असतात.
स्पाय बलूनची वैशिष्ट्ये
हेरगिरीसाठी स्पाय बलूनमध्ये अत्याधुनिक कॅमेरे बसवलेले असतात. हे फुगे एखाद्या क्षेत्राचा दीर्घकाळ अभ्यास करू शकतात, हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. जमिनीवरून ज्या क्षेत्राचे निरीक्षण करणे खूप कठीण आहे, त्या क्षेत्राचा अधिक अभ्यास करण्यासाठी याचा वापर केला जातो. स्पाय बलून जमिनीपासून जास्त उंचीवर उडू शकतात, म्हणून त्यांचा वापर हवामानाशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. तसेच, हेरगिरीसाठी हे फुगे उपग्रहांपेक्षा (Satellite) सरस ठरतात. कारण ते उपग्रहांपेक्षा एखादे क्षेत्र अधिक सहजपणे आणि जास्त काळ स्कॅन करू शकतात.