Sputnik V लस घेतल्यानंतर दोन महिने दारुचे सेवन नको, रशिया सरकारचा नागरिकांना सल्ला
रशियात Sputnik V च्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. या दरम्यान नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी या साठी दोन महिने दारुचे सेवन न करण्याचा सल्ला देण्यात आलाय.
मॉस्को: 'स्पुटनिक व्ही' चे लसीकरण सुरु झाल्यानंतर रशिया सरकारने आपल्या नागरिकांना दोन महिने दारुचे सेवन न करण्याचा सल्ला दिलाय. लसीकरणाच्या बाबतीत रशियाने जगात बाजी मारली आहे. रशियात सध्या आरोग्यकर्मी, सैनिक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना लस देण्यास सुरुवात झालीय. रशियाच्या या सल्ल्याने आता मद्यप्रेमींची चांगलीच गोची झाल्याचं दिसतंय.
कोरोनाची लस घेतल्यानंतर दारुचे सेवन न करण्याच्या सल्ल्यामागे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा उद्देश आहे असं रशियाच्या प्रशासनानं स्पष्ट केलंय.
रशियात 'स्पुटनिक व्ही' च्या लसीकरणास सुरुवात झाली असून याचा पहिला डोस देण्यात येत आहे. पहिल्या डोसनंतर 21 दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे. कोरोनावर सर्व प्रथम लस तयार केल्याचा दावा रशियाने केला होता. तसेच या देशाने लसीकरणातही आघाडी घेतली आहे. दारुच्या सेवनापासून दोन महिने दूर राहण्याच्या रशियाच्या सल्ल्यामुळे इतर देशातही अशा प्रकारचा सल्ला देण्यात येतोय का ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
रशियाच्या या निर्णयावर भारतातील काही अभ्यासकांनी सांगितलं की अशा प्रकारचा सल्ला देण्यामागं लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायचा हेतू आहे. त्याचसोबत ही लस दिल्यानंतर काही दिवसांनी त्या लसीचं कार्य सुरु होण्याची शक्यता असल्यानं असा सल्ला देण्यात आला असेल असंही भारतीय अभ्यासकांनी सांगितलं. रशियात ख्रिस्मस आणि नवीन वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जातं. आता दारुच्या सेवनापासून दूर राहण्याच्या सल्ल्यामुळे या कार्यक्रमांवर मर्यादा येण्याची शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
भारतातही कोरोनाच्या लसीकरणाचे सर्व नियोजन पूर्ण झाले आहे. पण ही लस दिल्यानंतरही काही दिवस नागरिकांनी मास्कचा वापर करणं बंधनकारक आहे तसेच काही दिवस दारुचे सेवन टाळणं आवश्यक असल्याचं अभ्यासकांकडून सांगण्यात येतंय.
महत्वाच्या बातम्या:
- Corona Vaccine | भारतात 8 कोरोना लसींवर क्लिनिकल ट्रायल सुरु; कोणत्या टप्प्यांत पोहोचली लसींची चाचणी?
- Corona vaccine | कॅनडाची Pfizer-BioNtech लसीच्या वापराला मंजुरी, लसीकरणासाठी सर्व नियोजन तयार
- Corona Vaccine | भारताला कोरोना लसीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार; काय आहे कारण?
- Corona vaccine | कोरोना लसीविषयी सर्व शंकांचं निरसन अगदी सोप्या शब्दात