Nepal Protest : नेपाळमध्ये राजेशाही कशी संपली? राजघराण्याच्या लोकांना गोळ्या कुणी घातल्या? जाणून घ्या Gen Z आंदोलनाच्या आधीचा इतिहास
Nepal Royal Massacre Story : सध्या लोकशाहीचा अनुभव घेणाऱ्या नेपाळमध्ये काही वर्षांपूर्वी राजेशाहीचा तामझाम होता. त्याचा रक्तरंजित अंत हा काही थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नव्हता.

मुंबई : हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमध्ये (Nepal) सध्या मोठा गोंधळ सुरू असून त्या देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. बालेन शाह हे नेपाळच्या अंतरिम सरकारचे नवे प्रतिनिधी असतील. सध्या लोकशाही मार्गाने या देशात सत्तांतर होत असलं तरी एकेकाळी, जवळपास 250 वर्षे शाह वंशाची (Shah Dynasty) राजेशाही (Monarchy) सुरू होती. एका भयानक नरसंहारामुळे (Royal Massacre) नेपाळच्या राजशाही परंपरेचा पाया हादरला आणि अखेरीस ती संपुष्टात आली.
शाह वंशाची सुरुवात आणि राणा शासन
1768 मध्ये पृथ्वीनारायण शाह (Prithvi Narayan Shah) यांनी गोरखा सैन्याला एकत्र करुन काठमांडू खोऱ्यातील लहान राज्ये जिंकली आणि आधुनिक नेपाळची पायाभरणी केली. शाह राजा हिंदू धर्माचे संरक्षक आणि विष्णूचे अवतार मानले जात होते. मात्र 1846 मधील कोत पर्व हत्याकांडानंतर (Kot Massacre 1846) जंग बहादूर राणांनी सत्ता हाती घेतली. राणा शासन ((Rana Rule 1846–1951) काळात राजे फक्त नावापुरते होते, प्रत्यक्ष सत्ता पंतप्रधान राणांकडेच होती.
Constitutional Monarchy In Nepal : भारताची भूमिका आणि घटनात्मक राजेशाही
सन 1950-51 मधील क्रांतीनंतर राजा त्रिभुवन (King Tribhuvan) यांनी भारताच्या मदतीने सत्ता मिळवली. दिल्ली करार (Delhi Agreement 1951) झाल्यानंतर नेपाळमध्ये घटनात्मक राजेशाहीची सुरुवात झाली. पुढे राजा महेंद्र (King Mahendra) यांनी 1960 मध्ये संसद बरखास्त करून पंचायत व्यवस्था (Panchayat System) आणली. 1990 च्या जनआंदोलनानंतर (People’s Movement 1990) राजा बीरेन्द्र यांना घटनात्मक राजेशाही मान्य करावी लागली. पण 1996 मध्ये सुरू झालेल्या माओवादी आंदोलनाने (Maoist Insurgency 1996–2006) राजेशाहीविरोधी संघर्षाला अधिक धार आली.
Nepal Royal Palace Massacre 2001 : राजघराण्याचा नरसंहार
काठमांडूतील नारायणहिटी पॅलेसमध्ये शाही मेजवानी सुरू असतानाच युवराज दीपेंद्र शाह यांनी स्वतःच्या कुटुंबीयांवर गोळ्या झाडल्या. यात राजा बीरेन्द्र, राणी ऐश्वर्या, त्यांची मुले निरंजन आणि श्रुती यांच्यासह 9 सदस्य ठार झाले. नंतर दीपेंद्रने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने राजेशाहीला मोठा धक्का बसला.
End of Monarchy : जनआंदोलन आणि राजेशाहीचा अंत
दीपेंद्रनंतर ज्ञानेन्द्र राजा झाले, पण त्यांची लोकप्रियता नव्हती. 2005 मध्ये त्यांनी संसदेला बाजूला सारुन प्रत्यक्ष सत्ता हाती घेतली, त्यामुळे लोकांचा संताप वाढला. 2006 मध्ये सात पक्षीय आघाडी आणि माओवादी यांच्यात 12 सूत्री करार झाला. लाखो लोक रस्त्यावर उतरल्याने ज्ञानेन्द्रना संसद पुन्हा सुरू करावी लागली.
नंतरच्या शांतता करारानंतर 2007 मध्ये (Nepal (Peace Accord 2006)) अंतरिम संविधान अस्तित्वात आले आणि राजेशाही निलंबित करण्यात आली. एप्रिल 2008 च्या संविधान सभेच्या निवडणुकीत माओवादी बहुमताने विजयी झाले. 28 मे 2008 रोजी संविधान सभेने 240 वर्षांची राजेशाही संपवून नेपाळला संघीय लोकशाही गणराज्य (Federal Democratic Republic of Nepal) घोषित केले. राजेशाही संपल्यानंतर राम बरन यादव (Ram Baran Yadav) हे नेपाळचे पहिले राष्ट्रपती झाले. नारायणहिटी पॅलेसला संग्रहालयात रूपांतरित करण्यात आले.
आजही आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये काहीजणांकडून राजेशाही पुनर्स्थापनेची मागणी होत आहे. असं असलं तरीही देशाने लोकशाही मार्ग कायम ठेवला आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेले ओपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे काठमांडूचे महापौर असलेल्या बालेन शाह यांच्याकडे अंतरिम सरकारची सूत्रे जाणार आहेत.
ही बातमी वाचा:























