एक्स्प्लोर
Advertisement
हिलरी क्लिंटन यांची कारकीर्द
मुंबई : अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद भूषवण्याचं स्वप्न पाहणं, ही काही छोटी गोष्ट नाही. पण अगदी सामान्य परिवारात जन्मलेल्या एका मुलीनं ते स्वप्न पाहिलं. हिलरी रॉडहॅम क्लिंटन आता आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होणारी पहिली महिला ठरण्याची संधी हिलरी यांच्याकडे आहे.
Quote on Women's Rights.. वूमेन्स राइट इज ह्यूमन राइट! 1995 साली बीजिंगमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महिला संमेलनात हिलरी क्लिंटन यांनी दिलेलं हे भाषण त्यांच्या विचारांचं प्रतिबिंब मांडतं.
एक राजकारणी म्हणून आणि त्याआधी एक वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ती म्हणून हिलरी यांच्या गाठीशी तब्बल तीन दशकांचा अनुभव आहे. फर्स्ट लेडी, सिनेटर, सेक्रेटरी ऑफ स्टेट, अशी पदं भूषवल्यानंतर हिलरी यांना राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवणारी पहिली महिला बनण्याचा मान मिळाला. पण प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीपासूनच हिलरी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
हिलरी यांचं बालपण शिकागोमध्ये गेलं. ह्यू आणि डोरोथी रॉडहॅम यांच्या या कन्येचा लहानपणापासूनच सामाजिक समस्यांकडे ओढा होता. 1960च्या दशकात मॅसॅच्युसेट्सच्या वेल्स्ली कॉलेजमध्ये आणि पुढ येल लॉ स्कूलमध्ये दाखल झाल्यावर हिलरी राजकारणात सक्रीय झाल्या. त्या काळात येल लॉ स्कूलमध्ये कायद्याचा अभ्यास करणाऱ्या मोजक्या महिलांपैकी हिलरी एक होत्या. येल लॉ स्कूलमध्येच हिलरी यांची बिल क्लिंटन यांच्याशी ओळख झाली. दोघांनी 1975 साली लग्न केलं. तीनच वर्षात बिल अरकान्सासच्या गव्हर्नरपदी निवडून आले.
पुढं बिल यांनी 1992 साली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यावर अमेरिकेच्या फर्स्ट लेडी या नात्यानं हिलरी यांचं नाव जगभर पोहोचलं. तुम्हाला एक के साथ एक फ्री असे एकाच मतात दोन राष्ट्राध्यक्ष मिळणार आहेत असं प्रचारादरम्यान बिल म्हणायचे, त्यात किती तथ्य होतं, तेही लगेच दिसून येऊ लागलं. हिलरी प्रत्येक मंचावर बिल यांच्या साथीनं दिसू लागल्या. अमेरिकेची फर्स्ट लेडी या नात्यानं त्यांनी आठ वर्षांत 79 देशांचा दौरा केला.
महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी तसंच वैद्यकीय सुविधा सुधारण्यासाठी त्यांनी नेटानं प्रयत्न केले. पण व्हाईटवॉटर प्रकल्पातील गुंतवणूक आणि बिल क्लिंटन यांच्या सेक्स स्कँडलची चर्चा अशा वादळांचा सामना केला. बिल क्लिंटन यांचा कार्यकाळ संपल्यावर हिलरी यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थानं बहरली.
हिलरी यांनी 2000 साली अमेरिकेच्या संसदेतील वरिष्ठ सभागृहाची म्हणजे सीनेटची निवडणूक लढवली आणि त्या न्यूयॉर्कच्या पहिल्या महिला सीनेटर म्हणून निवडून आल्या. 9 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर हिलरी यांनी न्यूयॉर्कच्या पुनर्वसनासाठी राष्ट्राध्यक्ष बुश यांच्या प्रशासनावर दबाव टाकला.
2007 साली हिलरी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. पण बराक ओबामांच्या लोकप्रियतेच्या लाटेत त्या मागे पडल्या. मग ओबामा राष्ट्राध्यक्षपदावर निवडून आल्यावर त्यांनी हिलरी यांची सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे परराष्ट्रमंत्रीपदी नेमणूक केली.
परराष्ट्रमंत्री या नात्यानं हिलरी यांनी 112 देशांचा दौरा केला. भारतासोबतही त्यांचं नातं जवळीकीचं नातं आहे. 2000 साली अमेरिकेची फर्स्ट लेडी या नात्यानं त्यांनी भारताचा दौरा केला होता. तर 2009 साली भारत दौऱ्यावर आल्यावर 26/11च्या अतिरेकी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहायला त्या विसरल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय मंचावर दहशतवादाविरोधी लढाईत हिलरी भारताच्या बाजूनं उभ्या राहिल्या होत्या.
अमेरिकेतल्याच नाही, तर जगभरातल्या अनेक लहान मुलींसाठी हिलरी एक आदर्श बनल्या आहेत. पण वॉलस्ट्रीटशी, भांडवलदारांशी त्यांची जवळीक, देशी विदेशी गुंतवणूकदारांची बिल क्लिंटन यांच्या संस्थेतली गुंतवणूक यांमुळं हिलरी यांच्याविषयी अनेकांच्या मनात संभ्रमही तयार झालाय. लिबियातल्या बंगाझीमध्ये अमेरिकन दूतावासावर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीतून त्या नुकत्याच बालंबाल बचावल्या आहेत.
सेक्रेटरी ऑफ स्टेट या पदावर असताना कार्यालयीन कामासाठी हिलरी यांनी केलेला खासगी ईमेलचा वापरही वादाचा मुद्दा बनला. हिलरी यांनी त्यामुळं देशाची सुरक्षितता धोक्यात टाकल्याचाही आरोप झाला. पण त्यातून सावरत हिलरी व्हाईटहाऊसच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement