Crude Oil Price : कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढणार? सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचे संकेत
Crude Oil Price : सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा निर्यातदार देश आहे. तर रशिया जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे.
Crude Oil Price : गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जगभरात इंधनाचे दर गगणाला भिडले आहेत. सध्या कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 115 डॉलरच्या जवळ आहेत. त्यातच सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी म्हटले आहे की, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी आपण सध्या कोणतेही प्रयत्न करणार नाही. त्यामुळे सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्यावरून कच्च्या तेलाच्या किमतींना आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या तर आधीच महागाईमुळे होरपळणाऱ्या भारताच्या अडचणी वाढणार आहेत.
दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत फरहान यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सध्या कच्च्या तेलाचा तुटवडा नसून सौदी अरेबियाला उपलब्धता वाढवण्यासाठी जे काही करावे लागत होते ते सर्व केले आहे.
कच्चे तेल निर्यात करणारा सौदी अरेबिया मोठा निर्यातदार
इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीनुसारच्या माहितीनुसार, सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा निर्यातदार देश आहे. रशिया जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. परंतु, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून कच्च्या तेलाच्या किमती 20 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असून, त्यामुळे किंमती वाढल्या आहेत.
कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारतातील सरकारी तेल कंपन्यांना 22 मार्च 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांनी वाढ करावी लागली आहे. तर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क आठ रुपयांनी तर डिझेलवर सहा रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 6 एप्रिल 2022 पासून सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.
कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीसाठी तेल कंपन्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.