![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
चीनकडून शिनजियांगमध्ये उइगर मुस्लिमांचा छळ, अवयवांची जबरदस्तीने विक्री; संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर
China : चीनवर उइगर लोकांवर अत्याचार करत असल्याचा आरोप केला जात आहे. चीनमध्ये उइगर आणि इतर वांशिक अल्पसंख्याकांना भेदभावची वागणूक दिली जात असून त्यांना अटक केली जात असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे.
![चीनकडून शिनजियांगमध्ये उइगर मुस्लिमांचा छळ, अवयवांची जबरदस्तीने विक्री; संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर China May Have Committed Crimes Against Humanity In Xinjiang चीनकडून शिनजियांगमध्ये उइगर मुस्लिमांचा छळ, अवयवांची जबरदस्तीने विक्री; संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/01/1dfed1a1169d2c30b45c6288839ce8cb1662029156472328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
China : चीनच्या शिनजियांग प्रांतात उइगर मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यांक (Uyghurs and other Muslim minorities) लोकांचा छळ केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार आयोगाच्या अहवालातून याबाबतची माहिती समोर आली आहे. शिनजियांग प्रांतात लोकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. उइगर वंशाच्या लोकांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत आणि या लोकांच्या अवयवांची जबरदस्तीने विक्री देली जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
शिनजियांगमध्ये उइगर मुस्लिम लोकांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. या लोकांवर जबरदस्तीने वैद्यकीय उपचार केले जात आहेत. एवढेच नाही तर धक्कादायक बाब म्हणजे या लोकांचे अवयव काढून काळ्या बाजारात विकले जात आहेत. शिवाय या लोकांसोबत लैंगिक अत्याचार देखील होत आहेत. असे या अहवालात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांचा हा अहवाल फार पूर्वी प्रसिद्ध होणार होता. मात्र, चीनचा त्याला विरोध आहे. हा अहवाल प्रसिद्ध व्हावा असे चीनला वाटत नव्हते. परंतु, संयुक्त राष्ट्राने नुकताच हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर चीनने म्हटले आहे की, चीनची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा अहवाल तयार करण्यात आला आहे. चीनचा विरोध असतानाही हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
चीनवर उइगर लोकांवर अत्याचार करत असल्याचा आरोप पाश्चात्य देशांकडून या पूर्वी देखील अनेकवेळा कण्यात आला आहे. याबाबतचे अहवाल वविध अहवाल संयुक्त राष्ट्राकडे जमा करण्यात आले आहेत. परंतु, चीनने वेळोवेळी हे आरोप फेटाळून लावले आहेत. चीनमध्ये उइगर आणि इतर वांशिक अल्पसंख्याकांना भेदभावची वागणूक दिली जात असून त्यांना अटक केली जात असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. या लोकांचे कायदेशीर अधिकार चीनकडून हिरावून घेतले जात आहेत. याकडे मूलभूत हक्कांवरील निर्बंध म्हणून पाहिले जाऊ शकते. शिवाय चीनकडून होणारे हे कृत्य म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्हा असल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे.
चीनच्या व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र व मानसोपचार रुग्णालयांमध्ये केल्या जाणाऱ्या उपचारांबाबत या अहवालात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. चीन राजकीय कैद्यांना मनोरुग्णालयात शिक्षा देत असल्याचा दावा एका मानवाधिकार गटाने केला आहे. मनोरुग्णालयात दाखल झालेल्या पीडितांना मारहाण केली जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या कैद्यांना विजेचे चटके दिले जात आहेत, शिवाय त्यांना बंद खोलीत कोंडले जात आहे. एवढेच नाही तर अल्पसंख्याक समुदायातील लोकांना अटक करून त्यांना जबरदस्तीने औषधे दिली जातात. धक्कादायक बाब म्हणजे या लोकांचे जबरदस्तीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे अहवालात म्हटले आहे.
उइगर मुस्लिम म्हणजे काय?
उइगर मुस्लिम हा चीनमधील अल्पसंख्याक समुदाय आहे. हा समाज शिनजियांग प्रांतात राहतो. चीनने या समुदायाला स्वदेशी मानण्यास नकार दिला असून त्यांच्यावर दहशतवाद आणि फुटीरतावादाचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे उइगर मुस्लिमांसोबत भेदभाव केला जातो आणि त्यांचा छळ केला जातो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)