Bangladesh Violence: शेख हसीना हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी रवाना, भारतात आश्रय घेणार? बांगलादेशमध्ये लष्करी राजवट लागू होण्याची शक्यता
military regime in Bangladesh: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, बहिणीसह देश सोडून अज्ञातस्थळी रवाना. शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीनं देश सोडला असून त्या दोघीही सुरक्षित स्थळी निघून गेल्या आहेत.
ढाका: बांगलादेशमध्ये उसळलेल्या यादवी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शेख हसीना आपल्या बहिणीसह काहीवेळापूर्वीच हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी रवाना झाल्या आहेत. शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी बांगलादेशची सूत्रे सोडल्यानंतर आता देशात लष्करी राजवट लागू होण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांनी आपले सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या घराचा ताबा घेतला आहे. त्यामुळे आता बांगलादेशमध्ये (Bangladesh) 'न भूतो न भविष्यती' परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेख हसीना या पुढील काही काळासाठी भारतात आश्रय घेऊ शकतात, असेही सांगितले जात आहे. बांगलादेशमध्ये सध्या प्रचंड मोठा नागरी संघर्ष सुरु आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 300 हून अधिक जणांना आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे बांगलादेशातील परिस्थिती गंभीर झाली होती. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या आंदोलनाचे लोण देशभरात पसरत जाऊन टोकाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर आपण ही परिस्थिती हाताळू शकणार नाही, हे ध्यानात आल्यामुळे शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जाते.
बांगलादेशात जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. सरकारी नोकरीत सध्या असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. या आंदोलनानंतर शेख हसीना सरकारने काही कोटा कमी केला, मात्र तरीही आक्रमक आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.
#WATCH | On reports of Bangladesh PM Sheikh Hasina leaving official residence in Dhaka, Pinak Ranjan Chakravarty, Former Indian High Commissioner to Bangladesh says, "This pressure and the demonstrations were mounting. Clearly, the government there was under pressure. The Army… pic.twitter.com/8IMeKffpLC
— ANI (@ANI) August 5, 2024
आरक्षणाचा नेमका वाद काय?
शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये आंदोलन पेटले होते. 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये 30 टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना 5 टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत होते. या आरक्षण व्यवस्थेविरोधात जुलै महिन्यात सुरु झालेल्या आंदोलनाने अल्पकाळात उग्र स्वरुप धारण केले होते.
बांगलादेशचे लष्करप्रमुख काय म्हणाले?
बांगलादेश लष्करप्रमुख वकार-उर-झमान यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, शेख हसीन यांनी राजीनामा दिला आहे. अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. सर्वांनी संयमी राहावे. आम्ही अंतरिम सरकार स्थापन करणार आहोत. सर्वांनी शांतता राखावी. हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही. प्रत्येक हत्या आणि इतर गुन्हेगारी प्रकरणांचा गांभीर्याने विचार केला जाईल. सर्व पक्षांचे नेते एकत्रितपणे आले होते आणि चांगली गोष्ट घडली आहे. सर्वपक्षीय बैठकीत अवामी लीगचे कोणीही नव्हतं. पंतप्रधानांनी राजीनामा दिला असून लवकरच अंतरिम सरकार स्थापन करणार आहोत. आम्ही अध्यक्षांशी बोलू. तुम्ही हिंसाचार करणार नाही,आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे.
आणखी वाचा