(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एमआयएमला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही : प्रकाश आंबेडकर
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व 48 जागांचे वाटप झाले असून आता महाआघाडीमध्ये येण्यासाठी आमच्याशी बोलणी करणे हा केवळ फार्स आहे, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व 48 जागांचे वाटप झाले असून आता महाआघाडीमध्ये येण्यासाठी आमच्याशी बोलणी करणे हा केवळ फार्स आहे, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
भाजप विरोधातील महाआघाडीमध्ये सामील व्हायचे असल्यास प्रकाश आंबेडकर यांना एमआयएमला बाजूल ठेवावे लागेल, असे स्पष्ट संकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिले आहेत. महाआघाडीत येण्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी देखील लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करावी असा काँग्रेस-राष्ट्रवादीचा आग्रह आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना आंबेडकर म्हणाले, "आम्ही एमआयएमला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही तसेच आमच्याशी बोलण्याचा फक्त फार्स सुरु आहे".
राहुल गांधी 2024 सालचे पंतप्रधानपदाचे उमेदवार
2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार यासाठी ओपन शर्यत असून ज्याच्याकडे 20 पेक्षा जास्त खासदार आहेत तो या शर्यतीत आहे, राहुल गांधी 2024 च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान व्हायचे असेल तर त्यांना काँग्रेसची साथ सोडावी लागेल, मायावती यांनी योग्य निर्णय घेतला असून इतर पक्षही लवकरच असे निर्णय घेतील असे देखील ते म्हणाले.
राफेल मुद्दयावर काँग्रेस अपयशी
राफेल प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर डाग लावण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींना पंतप्रधान पदावरून हलवणार नाहीत असे आंबेडकर म्हणाले.