(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Washim Crime News : भावाबहिणीच्या नात्याला काळीमा! अल्पवयीन बहिण 8 महिन्यांची गरोदर, नंतर कळलं आतेभाऊच कारणीभूत
Washim Crime News : भावाबहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना कारंजा लाड शहरात उघडकीस आली आहे. आतेभावानेच नात्यातील अल्पवयीन बहिणीचे शारीरिक शोषण केले, ज्यामध्ये ती 8 महिन्यांची गर्भवती राहिली आहे.
वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील कारंजा लाड येथे भावाबहिणीच्या नात्याला काळीमा फसणारी घटना घडली आहे. ज्यामध्ये आतेभावानेच नात्यातील अल्पवयीन 15 वर्षीय बहिणीचे बळजबरीने शारीरिक शोषण (Rape) केले, ज्यामध्ये मुलगी 8 महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास तुझ्या भावाला जीवे मारून टाकीन, अशी धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली होती. त्यामुळेच तरुणीने भीतीपोटी घडलेला प्रकार कुणाला सांगितला नाही; मात्र, अखेर 21 डिसेंबरला हा धक्कादायक प्रकार कुटुंबात उघडकीस आला. या गंभीर प्रकरणी दाखल तक्रारीवरून कारंजा शहर पोलिसांनी (Washim Crime News) पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे.
धमकी देत पीडितेवर सतत लैंगिक शोषण
पीडित अल्पवयीन मुलगी ही तिचा 18 वर्षीय भाऊ, वडील आणि आजीसोबत राहते. तिचा 23 वर्षीय आतेभाऊ हा मानोरा तालुक्यातील गलमगावचा रहिवासी आहे. तो कामानिमित्त 29 मार्च 2023 पासून कारंजातच राहत होता. पीडित मुलीच्या काकासोबत तो हमालीचे काम करायचा आणि रात्रीच्या वेळी पीडितेच्या घरीच झोपायचा. अशात एकेदिवशी त्याने रात्रीच्या वेळी घरातील सर्वजण झोपेत असताना पीडितेवर शारीरिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीसोबत सतत लैंगिक शोषण होत राहिले. मात्र याबाबत कुणाकडेही वाच्यता केल्यास तुझ्या भावाला जीवे मारून टाकीन, अशी धमकी आरोपीने मुलीला दिली. त्यामुळे पीडित मुलगी भीतीपोटी कायम गप्प राहत होती आणि आरोपी या संधीचा फायदा घेत होता. दरम्यान आरोपीची हिंमत आणखी वाढून त्याने पुढे पीडितेचे अनेकदा लैंगिक शोषण करणे सुरुच ठेवले. कालांतराने या प्रकारात पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे तिच्या लक्षात आले आणि ही बाब तिने आरोपीला सांगितली असता त्याने प्रकरणातून हात झटकण्यास सुरुवात केली.
अल्पवयीन बहिण 8 महिन्यांची गरोदर
21 डिसेंबरच्या दिवशी पीडित तरुणीच्या पोटात अचानक दुखायला लागले, या दरम्यान मुलीची आई बाहेरगावी वास्तव्याला होती. त्यामुळे या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ वडिलांनी मुलीच्या आईला बाहेरगावहून बोलावून घेतले. आई घरी परतताच स्वतःवर झालेला अत्याचार आणि आठ महिन्यांपासून लपवून ठेवलेला प्रकार पीडित मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितला. मुलगी आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे ऐकताच आई-वडिलांना जबर धक्का बसला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ कारंजा शहर पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात रितसर तक्रार दाखल केली.
आरोपी भावाला अटक
याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात भादंविचे कलम 376, 376(1) (एन), 376(3) सहकलम पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रियंका वासनिक करत आहेत.