विधानसभेची खडाजंगी : वाशिमवर कुणाचा वरचष्मा? तीन मतदारसंघात काँग्रेस-भाजपचा कस लागणार, पाहा आमदारांची यादी
Washim Politics : लोकसभा निवडणुकीवेळी तीनपैकी दोन मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराने मोठं मताधिक्य घेतल्याने महायुतीची धाकधूक वाढली आहे.
Washim Vidhan Sabha Election : वाशिम जिल्ह्यात भाजपाचा बोलबाला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने तिकीट वाटपासाठी पक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार असं दिसतंय. वाशिम जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील दोन विधानसभा मतदारसंघ, वाशीम आणि कारंजा हे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येतात. तर अकोला लोकसभा मतदारसंघात रिसोड या एका मतदारसंघाचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या संजय देखमुखांना वाशिम आणि कारंजा या दोन मतदारसंघातून 90 हजाराहून लीड मिळालं, तर रिसोड मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला लीड मिळालं आहे.
वाशिमधील तीन आमदारांपैकी एक आमदार काँग्रेसचा आहे तर एक भाजपचा आहे. कारंजा मतदारसंघातील जागा रिक्त असून त्या ठिकाणी भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांनी प्रतिनिधित्व केलं)
वाशिम जिल्ह्यातील आमदारांची यादी
- रिसोड - अमित सुभाष झनक, काँग्रेस
- वाशिम - लखन सहदेव मलिक, भाजप
- कारंजा - सध्या रिक्त ( याआधी दिवंगत राजेंद्र पाटणी, भाजप
रिसोडमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी
वाशिम जिल्ह्यातील रिसोड हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय. तर वाशिम विधानसभा हा राखीव असलेला मतदारसंघ भाजपचा गड समजला जातो. तिसरा मतदारसंघ असलेला कारंजा मतदारसंघ गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीपासून भाजपच्या ताब्यात आहे. 2019 च्या निवडणुकीत शिवसेना भाजपच्या युतीमुळे कारंजा, वाशिम या विधानसभा मतदारसंघावर भाजपने विजय मिळवला. तर रिसोड मतदारसंघावर शिवसेनेचे विश्वनाथ सानप आणि काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार अंतराव देशमुख यांचा पराभव करत काँग्रेसच्या झनक कुटुंबीयाने विजयाचा झेंडा कायम ठेवला. आमदार अमित झनक यांनी विजयाची हॅट्रिक केली.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहावयास मिळते. काँग्रेस सोडून भाजपवासी झालेल्या अनंतराव देशमुख आणि पुत्र नकुल देशमुख भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत . कॉंग्रेसच्या गडाला सुरुंग लावणारे, सलग दोन वेळा विजय मिळवणारे संघाचे कट्टर असलेले माजी आमदार विजयराव जाधव यांनी आपली ताकत उमेदवारी मिळवण्यासाठी लावली आहे.
लखन ठाकूर, सुनील पाटील, राजू पाटील राजे यांच्यासह महायुतीतील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या काही जणांचे नाव चर्चेत आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून दिलीप जाधव यांच्या नावाची चर्चा आहे.
स्वाभिमानी आणि वंचितही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
या मतदारसंघात शेतकरी आणि तरुणाचे प्रश्न घेऊन स्वभिमानी शेतकरी संघटनेने मोठी तयारी केली असून कार्यकर्त्याची फळी आणि गावागावात आपला दबदबा निर्माण केला आहे. स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले हे रिंगणात उतरणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीही आपला उमेदवार उतरवणार असून किरण गिर्हे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. प्रशांत गोळे आणि रविंद्र मोरे हेदेखील वंचित बहुजन आघाडीकडून दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिसोड मतदारसंघात चौरंगी लढत होणार हे निचित आहे.
2019 सालची विधानसभा निवडणूक निकाल
- अमित सुभाष झनक, काँग्रेस- 69,875 (2,141 मतांनी विजयी)
- अनंतराव विठ्ठलराव देशमुख, अपक्ष - 67,734
- दिलीप जाधव, वंचित बहुजन आघाडी - 34,475
वाशिममधून भाजपच्या इच्छुकांच्या संख्येत वाढ
वाशिम विधानसभा मतदारसंघात विजयी हॅट्रीक करणारे आणि भाजपचा गढ कायम राखणारे आमदार लखन मलिक याचं वजन भाजपमध्ये अधिक आहे . संघाचे कट्टर आणि मेहतर समाजाचे नेतृत्व करणारे लखन मलिक हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. 2009 ते 2024 पर्यंत मलिक यांनी वाशिम विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. मात्र भाजपच्या आमदारांपैकी अत्यंत कमी शिक्षण झालेले लखन मलिक हे विकास करण्यास अकार्यक्षम असल्याचा आरोप पक्षातील लोकाकडून सातत्याने केला जातोय. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्यांची मोठी संख्या आहे.
यामध्ये राहुल तुपसांडे याचं नाव सर्वात आघाडीवर आहे. ते वाशिमचे नगरसेवक आहेत. त्यांच्या आई मीरा तुपसांडे नगराध्यक्ष होत्या तर वडील मोतीराम तुपसांडे नगरसेवक होते. राजकीय वलय असलेले युवा उच्चशिक्षित अशी ओळख असलेल्या राहुल तुपसांडे याचं नाव अग्रस्थानी आहे. तर श्याम खोडे, दीपक ढोके, संगीता इंगोले आणि माजी आमदार भाजप पुरुषोत्तम राजगुरू हेदेखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. ठाकरे गटाकडून निलेश पेंढारकर आणि राजा भैया पवार हे इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून दिलीप भोजराज, सोनाली जोगदंड, मधुकर जुमडे हे इच्छुक आहेत.
वाशिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे पारडे सध्यातरी जड आहे. मात्र सुशिक्षित आणि विकास खेचून आणणारा आमदार हवा या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाणार हे निश्चित.
2019 सालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
- लखन सहदेव मलिक, भाजप - 66,159 (13,695 मतांनी विजय)
- सिद्धार्थी आकाराम देवळे, वंचित बहुजन आघाडी - 52 564
कारंजामध्ये भाजपची बांधणी चांगली, पण उमेदवार कोण?
कारंजा मतदारसंघाचा इतिहास तसा फार काळ एका पक्षाशी जोडल्या गेला नाही. भाजपने इथे सलग दोन वेळा विजय मिळवला. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके हे आमदार म्हणून निवडून गेले होते. मात्र 2014 मध्ये त्यांचं तिकीट कापून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला.
2004 ते 2009 मध्ये या मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र पाटणी निवडून गेले होते. त्या पूर्वी बाबासाहेब धाबेकर काँग्रेसकडून निवडून गेले होते. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. राज्याच्या राजकारणात शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. माजी आमदार प्रकाश डहाके याचं कोरोनाने निधन झाले.
या मतदारसंघात भाजपकडून राजू पाटील राजे , आमदार पुत्र ज्ञायक पाटणी हे दोघे इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सईबाई डहाके , युसुफ पुंजानी, जिल्हापरिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तर शरद पवार गटाकडून डॉ. श्याम राठोड, शिवसेना शिंदे गटाकडून डॉ. अमित चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. प्रहारकडून मानोरा नगरपंचायतचे नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. महायुतीच्या कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळते ते पहावे लागेल. मात्र या मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे निश्चित आहे.
कारंजा विधानसभा मतदारसंघ
- राजेंद्र पाटणी, भाजप - 73,205 (22,724 मतांनी विजयी)
- प्रकाश डहाके, राष्ट्रवादी काँग्रेस - 50,481
ही बातमी वाचा: