Washim: पीएचडी धारक बनला गावचा कारभारी, वाशिमच्या ग्रामवडजीच्या सरपंचपदी शत्रुघ्न बाजड
पीएचडी झाला असला तरी गावातील मूलभूत समस्यांचा उडालेल्या बोजवाऱ्यामुळे त्याने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आणि निवडून आला.
वाशिम: नुकतंच जिल्ह्यातील 287 ग्रामपंचायत निवडणुकीच्या निवडणुका पार पडल्या. त्याचे निकालही हाती आले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये सुशिक्षित युवा वर्ग गावचे कारभारी झाल्याचे चित्र आहे. त्यापैकी वाशिमच्या एका गावातील निवडणूक विशेष ठरली आहे. गावगाडा हाकायला आता पीएचडी पदवीधारकाला सरपंच म्हणून गावकऱ्यांनी कौल दिला आहे.
वाशीमच्या रिसोड तालुक्यातील ग्रामवडजी येथील शत्रुघ्न बाजड या तरुणाचं हैद्राबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या ठिकाणी शिक्षण पूर्ण झालं आहे. उच्चशिक्षीत असला तरी गावावरील त्यांचा स्नेह आणि ओढ शत्रुघ्न बाजडला स्वस्थ बसू देत नव्हती. गावातील मुलभूत समस्या बघून तो कासाविस होत होता. आपणही निवडणूक लढवून गाव विकसित करावं या उद्देशाने सरपंच म्हणून राजकीय आखाड्यात तो उतरला आणि 2500 लोकवस्तीच्या गावात सरपंच म्हणून विजयी झाला.
गावगाड्याच्या, गल्ली-बोळाच्या निवडणुका म्हटलं कि ग्रामपंचायत निवडणुकीच चित्र समोर येतं. त्यात प्रस्थापित नेते आणि टोपी- फेटेवाले नागरिक गावगाड्याची जबाबदारी पार पाडताना दिसत होते. म्हणजे सरपंचपदाचा कारभार हाकताना वर्षानुवर्षे तेच लोक दिसायचे. आता मात्र काळ बदलला आणि डिजिटल युग आलं, शिक्षणाचं महत्व वाढलं. या सगळ्या गोष्टीत बदल घडायला लागले. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही बदल होताना दिसून आलाय. अगदी निवडणूक प्रक्रियेपासून तर सरपंच निवडून येईपर्यंत नवतरुण चेहरे राजकारणात उतरल्याचं चित्र आहे. मतदारांनी प्रस्थापितांना बाजूला सारत या शिक्षित नवतरुणांना पसंती देत निवडून दिल्याचं दिसून येतंय.
उच्च शिक्षित तरुण गावकऱ्यांनी शत्रुघ्न बाजला सरपंच म्हणून स्वीकारले असले तरी आपल्या शिक्षणाचा कितपत उपयोग गावाच्या विकासासाठी करतो ते येणारा काळच ठरवणार आहे.
औरंगाबादमध्ये शिपायाने संस्थाचालकाचा केला पराभव
औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीची ठरल्या. त्यातच हिरापूर थापटी तांडा ग्रुप ग्रामपंचायतीसाठी झालेली लढत देखील अशीच काही चुरशीची ठरली. कारण या ठिकाणी सरपंच पदाच्या निवडणुकीत संस्थाचालक कल्याण राठोड यांच्याविरोधात त्यांच्याच संस्थेतील शिपाई विनोद बाबू राठोड हे रिंगणात होते. त्यामुळे संस्थाचालक विरुद्ध शिपाई या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अंतिम लढतीत शिवशाही ग्रामविकास पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार विनोद बाबू राठोड (शिपाई) यांनी शेतकरी ग्राम विकास पॅनेलचे कल्याण राठोड (संस्थाचालक) यांना पराभूत केले. त्यामुळे या निकालाची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळाली.