Delhi : दिल्लीत झोपडपट्ट्यांवर 100 फुटी भिंत कोसळली, दोन चिमुरड्यांसह आठ जणांचा मृत्यू
Delhi Jaitpur Wall Collapse :जैतपूर भागातील एका समाधी स्थळावर बांधण्यात आलेली भिंत बाजूच्या झोपडपट्ट्यांवर कोसळली आणि त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या दक्षिण-पूर्व भागातील जैतपूर परिसरात रक्षाबंधनाच्या दिवशी (शनिवार, 9 ऑगस्ट) सकाळी साडेनऊच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. समाधी स्थळावरील सुमारे 100 फुट लांबीची भिंत अचानक कोसळून तिच्या खाली असलेल्या झोपड्यांचा चेंदामेंदा झाला. त्यामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुष, दोन महिला आणि दोन लहान मुलींचा समावेश आहे. या ठिकाणी अद्याप बचावकार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिंत कोसळल्याने जवळील अनेक झोपड्या मलब्याखाली दबल्या गेल्या. घटनास्थळी दिल्ली पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ व स्थानिक प्रशासनाची पथके तातडीने दाखल झाली. बचाव मोहिमेतून आठ जणांना बाहेर काढण्यात आले. त्यांना एम्स ट्रॉमा सेंटर आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला.
मृतांची ओळख पटली असून त्यात रुबीना (25), डॉली (25), रुखसाना (6) आणि हसीना (7) यांचा समावेश आहे. एक जखमी हिशबुल नावाच्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
VIDEO | Delhi: Several injured as 50-foot wall collapses in Jaitpur; District Magistrate (South-East) Sravan Bagaria says, “Last night, due to the wall collapse, people were trapped here. The eight people reported injured have been taken to hospital. NDRF, fire services, police,… pic.twitter.com/YeeXBpBLAB
— Press Trust of India (@PTI_News) August 9, 2025
बचाव पथक अद्याप सुरू
डीसीपी साऊथ ईस्ट हेमंत तिवारी यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक 5 ते 7 मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटवून अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. बचाव कार्य सुरू असून अजून कोणी दबले आहे का याची पाहणी केली जात आहे.
फायर ब्रिगेड अधिकारी मनोज महलावत यांनी सांगितले की, भिंत समाधी स्थळावर बांधलेली होती आणि ती कोसळल्याने अनेक झोपड्या तिच्या खाली सापडल्या. या घटनेनंतर जिल्हाधिकारी (DM) दक्षिण-पूर्व डॉ. सरवन बगडिया, DDMA ची टीम आणि अन्य विभागांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून सखोल चौकशी सुरू आहे.
दिल्लीतील जैतपूर भागात घडलेली ही दुर्घटना परिसरातील दुर्लक्षित पायाभूत सुविधा व सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न निर्माण करते.
ही बातमी वाचा:
























