लग्नासाठी घरातून पळून गेले, वाशीमच्या पोलीस स्टेशनमध्ये प्रेमी युगुलांचं 'शुभमंगल सावधान!'
Washim Police : वाशीमच्या शिरपूर पोलिसांनी घरून पळून गेलेल्या प्रेमी युगुलाला नातेवाईकांच्या ताब्यात देऊन, पोलीस ठाण्याच्या आवारात लग्न लावून दिले.
Washim Police : पोलिसांच्या बाबतीत बोलताना नेहमी असं म्हणतात की, पोलीस हे कायदा आणि सुव्यवस्था राखताना नेहमी ताठर भूमिका घेत असतात आणि त्यांच्या कृतीतून देखील ते नेहमी समोर येत असतं. मात्र, पोलीस ठाण्यात एखादे प्रेमी युगुल आले आणि पोलिसांनी समजूत घालून लग्न लावून दिले, असं कमी वेळा पाहायला मिळतं. मात्र, वाशीमच्या शिरपूर पोलिसांनी घरून पळून गेलेल्या प्रेमी युगुलाला नातेवाईकांच्या ताब्यात देऊन, पोलीस ठाण्याच्या आवारात लग्न लावून दिले. त्यामुळे पोलिसांच्या सामाजिक बांधिलकीमुळे शिरपूर पोलीस चांगलेच चर्चेत आले आहेत.
वाशीमच्या शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश बाजड या 21 वर्षीय तरुणाचं गावातील तरुणी शिवानी मानवतकर वय 20 वर्षे हिच्यावर प्रेम जडलं आणि घरून पळून जाऊन आपला संसार थाटण्याचा निर्णय दोघांनी घेतला. घरी काहीही न सांगता त्यांनी घर सोडले. मात्र, या बाबत दोघांच्या पालकांनी शिरपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. दोन्हीही प्रकरणांचा तपास बिट अंमलदार महादेव चव्हाण यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानुसार दोन्हीही मिसींग व्यक्तींना पोलीस स्टेशन शिरपुर येथे हजर केले गेले. त्यावेळी त्या दोघांनीही त्यांचे एकमेकांवर प्रेम असून, ते दोघेही सोबत पळून गेले होते असे सांगीतले.
तसेच, गणेश व शिवानी यांनी आपल्याला एकमेकांसोबतच लग्न करायचे आहे, असे म्हटले. मात्र, दोघांच्याही घरची परिस्थीती जेमतेम असल्याने लग्नास लागणारा खर्च त्यांच्याकडे नव्हता. त्यावेळी दोघांचीही समजूत काढत, या लग्नाआधी दोन दिवस विचार करा, असे सांगून त्यांना आपापल्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
गणेश जाधव व शिवानी मानवतकर हे दोघेही त्यांच्या नातेवाईकांसह पुन्हा पोलीस स्टेशनला आले व त्यांनी आपल्याला लग्न करायचे आहे, असे सांगितले. त्यावेळी ठाणेदार सुनिल वानखडे यांनी पुढाकार घेत दोघांच्याही आईंची लग्नास संमती असल्याची खात्री केली. दोघांचेही नातेवाईकांचा लग्नास होकार असल्याने, तसेच दोघांचेही लग्नाचे वय पूर्ण होत असल्याने शिरपुर पोलीस स्टेशनच्याच आवारात गणेश शिवाजी जाधव व शिवानी घनश्याम मानवतकर यांचे रीतसर मंगलाष्टक म्हणत लग्न लावून दिले. तसेच, या नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रेमी युगुलाचे कुटुंबीय आणि शिरपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी या लग्नात वऱ्हाडी म्हणून उपस्थित होते. या घटनेनंतर शिरपूर पोलीस स्टेशन जिल्ह्यात चांगलेच चर्चेत आले आहे.
हेही वाचा :
- Anil Deshmukh : ...म्हणून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचा जबाब
- Praveen Raut Arrested : संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक; ईडीची कारवाई
- चिथावणीखोर हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha