Wardha News : पुलगावमध्ये पूर पाहायला गेलेले दोन मित्र नाल्यात वाहून गेले, गावावर शोककळा
Wardha News : वर्ध्यातील पुलगावमध्ये पूर पाहायला गेलेली दोन मुले नाल्यात वाहून गेल्याने गावावर शोककळा पसरली आहे. प्रणय जगताप आणि आदित्य शिंदे अशी या दोन मुलांची नावं आहेत.
Wardha Rains : वर्धा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला असल्याने ही परिस्थिती अनेक नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहे. पूर पाहायला गेलेल्या दोन मुले नाल्यात वाहून गेल्याने गावावर शोककळा पसरली आहे. प्रणय जगताप आणि आदित्य शिंदे अशी या दोन मुलांची नावं आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी रामटेके लेआऊटमधील एक महिला सुद्धा पुरामध्ये वाहून गेली होती.
यंदा आलेल्या पावसाने देवळी तालुक्यातील नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. पुलगाव इथल्या परंडा भागात राहणारे दोन मुले नाल्याचा पूर बघायला गेले होते. ही दोन्ही मुले नाल्यावरील पूर बघण्यास गेले असता त्यांचा पाय घसरला आणि ते नाल्यात पडून वाहत गेली. एकमेकांचा हात पकडलेला असल्याने दोघेही पाण्यात पाण्यात पडले आणि वाहून गेले.
वाहून गेलेले दोघेही मित्र
गावात पूर म्हणजे एकप्रकारे कुतूहल हे असतेच. नाल्याला आलेला पूर पाहायचा म्हणून ही मुले तिथे गेले खरे मात्र हेच त्याच्या जीवावर बेतू शकतं याचा कदाचित त्यांनी विचार केला नसावा. उत्सुकतेपोटी ही मुले पूर पाहण्यासाठी गेले. मृत प्रणय कुलदीप जगताप (वय 14 वर्षे) आणि आदित्य संजय शिंदे (वय 15 वर्ष) हे दोघेही चांगले मित्र होते. नाल्यावर गेले असता दोन्ही पाय घसरुन ते पाण्यात पडले आणि प्रवाहासोबत वाहून गेले.
कुटुंबियांनी फोडला हंबरडा, गावावर शोककळा
वाहून गेलेल्या दोन्ही मुलांचा शोध प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने सुरु करण्यात आला. दरम्यान त्यातला प्रणय जगताप याचा मृतदेह काही अंतरावर झाडाला अडकलेला आढळला. मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. तसेच दुसरा मुलगा आदित्य शिंदे याचाही मृतदेह नाग मंदिराजवळ नाल्यामध्ये सापडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे पुलगाव परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
धुंवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत
वर्धा जिल्ह्यात बरसत असलेल्या धुंवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन पुलावरुन आपलं घर गाठावं लागत आहे. आता पुलगाव येथील पिपरी गावातील पुरात वाहून गेलेल्या पुलाचा व्हिडीओ समोर आला असून आहे. नागरिकांना पुराच्या पाण्यातून आपली वाटही शोधावी लागत असून त्यावरुन जीवघेणा प्रवास सुरु आहे. अजूनही परिस्थिती पूर्ववत झाली नसून नागरिकांना येथील पाणी ओसरण्याची प्रतीक्षा आहे.
दुसरीकडे पिंपरी खराबे येथील गुराखी सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेला होता त्याचाही मृतदेह सुद्धा लोणी इथे सापडल्याची माहिती मिळत आहे. एकंदरच मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आणलं आहे. तसंच अनेक नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा केलं आहे.
Wardha : वर्धा जिल्ह्यात पुरात दोन मुलं वाहून गेली ABP Majha