Wardha News : शेतीला पाणी देण्यासाठी गेलेल्या बापलेकावर काळाचा घाला; कॅनॉलमध्ये बुडून दोघांचा मृत्यू, वर्ध्यातील घटना
शेत शिवारात गव्हाला ओलित करण्यासाठी गेलेल्या बापलेकावर काळाने घात केला आहे. शेतातील ओलित आटोपल्यावर मातीने माखलेले हातपाय धुण्यासाठी कॅनलवर गेलेल्या बापलेकाचा यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Wardha News वर्धा : शेत शिवारात गव्हाला ओलित करण्यासाठी गेलेल्या बापलेकावर काळाने घात केला आहे. शेतातील ओलित आटोपल्यावर मातीने माखलेले हातपाय धुण्यासाठी कॅनलवर गेलेल्या बापलेकाचा यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना वर्धा जिल्ह्यातील (Wardha News)आर्वी तालुक्यातील सालफळ येथे बुधवारी घडली. अरविंद मधुकर कोहळे (वय 55 वर्ष) आणि त्यांचा मुलगा चेतन अरविंद कोहळे (वय 18 वर्ष) असे या अपघातात मृत दोघा बापलेकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात सर्वत्र शोककळा पसरली असून या घटनेचा पुढील तपास पुलगाव पोलीस (Wardha Police) करीत आहेत.
बापलेकावर काळाचा घाला
सालफळ येथील रहिवासी असलेले अरविंद कोहळे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी चेतन देखील आपल्या वडिलांना मदत म्हणून त्यांच्या सोबत गेला होता. शेतातील कामे आटपून घरी जात असतांना जवळच वाहणाऱ्या कॅनॉलजवळ ते हातपाय धुण्यासाठी गेले. रात्रीची वेळ असल्याने चेतनला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा अचानक पाय घसरून तो पाण्यात पडला. वाहत्या पाण्याला बऱ्यापैकी वेग आल्याने चेतन त्यात वाहत गेला. हे बघून अरविंद यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी देखील कॅनॉलमध्ये उडी घेत त्याच्या बचावासाठी कसोशीने प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. या उलट ते देखील या पाण्यात वाहत गेले.
कॅनॉलमध्ये बुडून दोघांचा मृत्यू
रात्री बराच वेळ होऊनही अरविंद आणि चेतन घरी न परतल्याने कुटुंबियांची चिंता वाढली. त्यानंतर घरातील कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शेताच्या रस्त्याने निघाले असता त्यांना बैल एकटेच येताना दिसले. त्यांनी शेताजवळ जाऊन पाहिले असता त्या दोघांच्याही चपला कॅनलच्या जवळ दिसल्या. मात्र ते दोघेही कोठेही दिसून आले नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी दोघांचा शोध सुरू केला असता, रात्री अकरा वाजताच्या सुमारास त्यांना अरविंद यांचा म्रुतदेह सापडला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता ही माहिती पोलिसांनी दिली असता पोलीस आणि ग्रामस्थांनी मिळून चेतनचा देखील तपास केला. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. मात्र, आज सकाळी (29 फेब्रुवारी) पुन्हा शोध घेतला असता ग्रामस्थांना चेतनचा देखील मृतदेह सापडला. त्यानंतर पुलगाव पोलिसांनी पुढील प्रक्रिया करत दोन्ही मृतदेह पुलगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता नेले.
कुटुंबीयासह परिसरात शोककळा
अठरा वर्षीय चेतन कोहळे हा इयत्ता 12 चा विद्यार्थी असून सध्या त्यांची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. मात्र तो आपल्या शिक्षणासोबतच शेतकरी वडिलांना देखील शेतीच्या कामात मदत करत होता. मात्र नियतीने त्यांचा घात केला आणि त्यात त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील दोन जीव गेल्याच्या या घटनेमुळे कोहळे कुटुंबियासह परिसरात शोककळा पसरली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या