Wardha Crime News : दागिन्यांची चोरी करणाऱ्या नागपूरच्या महिला टोळीला अटक, 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या नागपूरच्या अट्टल महिला टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
Wardha Crime News : सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या नागपूरच्या अट्टल महिला टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांकडून 2 लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिसांनी ही अटक केली आहे. वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले होते.
हिंगणघाट शहरातील बस स्टॅन्डवरुन प्रवासी महिलांच्या बॅगमधील दागिने चोरी करणाऱ्या चोरट्या महिलांच्या टोळीला हिंगणघाट पोलिसांनी अखेर अटक केली आहे. ही महिलांची टोळी नागपूर येथील असल्याचे सांगण्यात आलं आहे. फिर्यादी कान्ता ज्ञानेश्वर झोरे या त्यांच्या वर्धा येथील नातेवाईकांच्या घरी जात असताना, हिंगणघाट बस स्टॅण्डवर फिर्यादीने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले 12 तोळे सोन्याचे दागिणे अज्ञात चोरट्यानं चोरुन नेले होते. त्यामुळं सदर महिलेनं हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून दागिने चोरी केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ या गुन्ह्याची दखल घेत नोंद केली होती. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला होता. अखेर चोरी करणारी नागपूरच्या महिलांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. त्यांच्याकडून दागिने जप्त करण्यात आले आहेत.
2 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त
गुन्हा दाखल होताच हिंगणघाट पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी शेखर डोंगरे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला. त्यांनी हिंगणघाट शहर, यवतमाळ, वणी, वरोरा, पांढरकवडा व लगतच्या परिसरातील माहीती काढली. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध सुरु करुन आरोपींचा शोध घेतला. मालाबाई मनोहर मानकर (वय 42 ), कविता जतन नाडे (वय, 40 ) संगीता कन्ना नाडे (सर्व रा. शताब्दी नगर, रामेश्वरी टोली, अजनी, नागपूर) अशी या तिन्ही आरोपींची नावे आहेत. या आरोपींना ताब्यात घेवुन त्यांना अटक केली आहे. त्यांचा पिसिआर घेण्यात आला आहे. पिसिआर काळात सर्व महिला आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले संपुर्ण सोन्याचे दागिनं असा एकूण 2 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ
वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली बघायला मिळत आहे. बस स्टँडवरील प्रवासी महिलांच्या बॅगला टार्गेट करुन बॅगमधील मुद्देमाल पळविल्याच्या अनेक घटना सतत घडत असून, पोलिसात तक्रारी दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. नुकतीच तीन दिवसांपूर्वी वर्धा बस स्थानकावर देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. यासंदर्भात देखील चोरट्यांचा शोध वर्धा शहर पोलिसांकडून सुरु आहे. चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: